शेअर मार्केटच्या माध्यमातून फसवणूक

कोकिसरे येथील महिलेला अटक

कणकवली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून कणकवली येथील एका व्यक्तीची ७ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक स्वप्निल शांताराम बेळेकर ( वय ४१, रा. कोकिसरे, खांबलवाडी ) याने व त्याच्या पत्नीने केली होती. त्याला अटक केल्यावर पोलिसांनी त्याची पत्नी विनया बेळेकर ( वय ४१) हिला तिच्या मोबाइल लोकेशनवरून शोधून काढत गुरुवारी अटक केली आहे.

याप्रकरणी कणकवली येथील सर्वेश भिसे यांनी पोलिस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार २५ मे २०२२ ते ११ ऑक्टोबर २०२४ या मुदतीत स्वप्निल बेळेकर याने सर्वेश भिसे यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला होता, तसेच दहा ते बारा टक्के दरमहा परतावा दिला जाईल असेही सांगितले होते. या आमिषाला बळी पडून सर्वेश भिसे यांनी बेळेकर याच्या सांगण्यावरून देवकन्या बिझनेस वर्ल्ड या कंपनीत १२ लाखांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर स्वप्निल बेळेकर याने परतावा म्हणून ४ लाख ७७ हजार रुपये सर्वेश भिसे यांना दिले. मात्र, उर्वरित ७ लाख २३ हजार रुपयांची रक्कम देण्यास तो टाळाटाळ करू लागला. त्यामुळे सर्वेश भिसे यांना आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.

त्यानुसार या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ करत होते. त्यादरम्यान संशयित आरोपी स्वप्निल बेळेकर याला पोलिसांनी वैभववाडी येथून ४ एप्रिल रोजी ताब्यात घेत अटक केली होती. त्याला प्रथम पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यानंतर त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

या फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याची पत्नी विनया हिचा सहभाग असल्याने तिचा शोध पोलिस घेत होते. गुरुवारी तिला ओरोस येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशी अंती तिला अटक करून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!