कुडाळला वीज कोसळून सेंट्रिंग कामगाराचा जागीच मृत्यू

पॅन्टच्या खिशातील मोबाईलचाही स्फोट

कुडाळ : पाऊस आल्याने कुडाळ शहरातील हॉटेल सत्कारच्या मागे एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सेटिंगचे काम थांबवून खाली येऊन उभ्या राहिलेल्या उत्तरप्रदेश येथील सेंटिंग कामगार बुलट शिवपूजन अन्सारी (२२, मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. कुडाळ-शिवाजी पार्क) याच्यावर बीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजेचे तांडव व प्रचंड गडगडाट सुरू असताना घडली.

बुलट अन्सारी याच्या हाफपेंटच्या खिशात असलेल्या मोबाईलचाही स्फोट होऊन मोबाईलचे तुकडे झाले. दरम्यान, त्या ठिकाणी काहीशा अंतरावर उभे असलेले अन्य सहा कामगार सुदैवाने बचावले. या घटनेची खबर बुलट याचा सख्खा भाऊ इद्रिस शिवपूजन अन्सारी यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.

कुडाळ-शिवाजी पार्कनजीक हॉटेल सत्कारच्या मागे एका इमारतीचे तिसऱ्या मजल्यावरील सेंटिंगचे काम मंगळवारी सुरू होते. तिथे हे कामगार काम करीत होते. दरम्यान, दुपारपासूनच काही प्रमाणात पाऊस सुरू झाला. पाऊस कमी असल्याने या कामगारांनी काम सुरू ठेवले होते. मात्र, सायंकाळी अचानक विजेचा लखलखाट व ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे बुलट अन्सारी व अन्य कामगार खाली उतरले. ते इमारतीच्या बाजूला उभे होते. बुलट हा माडाच्या बाजूला एकटाच उभा होता, तर अन्य सहाजण साधारण तीस ते पस्तीस फुटावर उभे होते.

घटनेने सहकारी हादरले

विजेचे तांडव सुरूच होते. विजेचा एक लोळ त्या माडाच्या दिशेने आला आणि ही वीज तेथे उभ्या असलेल्या बुलट याच्यावरही कोसळली आणि तो जमिनीवर कोसळला. या घटनेने त्याचे सहकारी हादरले. सहकारी कामगार व अन्य काहीजणांनी त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

पँटच्या खिशातील मोबाईलचा स्फोट

दरम्यान, विजेचा लोळ कोसळल्यानंतर ग्रामीण बुलट याच्या हाफपेंटच्या खिशात असलेल्या मोबाईलचाही स्फोट झाला आणि त्या मोबाईलचे तुकडे झाले. बुलट याचा मोठा भाऊ इद्रिस अन्सारी हाही त्याच्यासोबत सेंटिंग काम करीत होता. इद्रिस व अन्य कामगार तीस ते पस्तीस फुटांवर उभे होते. त्यांनी विजेचा लोळ पाहिला. प्रचंड मोठा आवाज आल्याने ते बिथरले. त्यांना विजेचा काहीसा धक्का बसल्याची जाणीव झाली. मात्र, सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

तहसीलदारांनी घेतली माहिती

या घटनेची माहिती मिळताच कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी येथील रुग्णालयात भेट देत माहिती घेतली.

अकरा दिवसांपूर्वीच कुडाळला आला होता

बुलट अन्सारी उत्तरप्रदेश येथून नऊ मे रोजी कुडाळ येथे कामाला आला होता. त्याचा भाऊ इद्रिस हा आज त्याच्यासोबत येथे कामाला होता. त्याच्यासमोरच ही दुर्दैवी घटना घडली. बुलट कुडाळमध्ये कामाला आल्यानंतर अवघ्या अकरा दिवसांच्या आतच ही घटना घडली, या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे व अन्य अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पंचनामा व पुढील कार्यवाहीचे काम उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात सुरू होते.

error: Content is protected !!