कणकवलीः वागदे शाळा नंबर १ च्या व्हरांड्यातील लोखंडी बाराला गळफास घेतलेल्या अवस्थेत सागर प्रमोद गावडे (वय ३३, रा. वागदे, गावठणवाडी) हा तरुण आढळून आला. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास उघड झाली.
सागर गावडे हा सहकाऱ्यांसह मंडप डेकोरेशनचे काम करत असे. सागर याने आत्महत्या का केली? हे अजून स्पश्ट झालेले नाही. मात्र, त्याला गुटखा तसेच तंबाखू खाण्याचे व्यसन होते. त्यामुळे आपल्याला तोंडाचा कॅन्सर झाला असेल असे त्याला अधून मधून वाटत असे. तसे त्याने काही जणांजवळ बोलून दाखवले होते. त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सोमवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत सागर हा घरात होता. त्याने आपल्या मोबाईलच्या स्टेट्सला ‘आय ऍम स्वारी ‘असे लिहिले होते. वागदे शाळा नंबर १ येथे अंगणवाडी आहे. सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास अंगणवाडी सेविका तिथे गेली असताना सागर हा गळफास घेतलेल्या अवस्थेत तिला दिसून आला. तिने पोलिस पाटील तसेच इतर व्यक्तींना त्याबाबत सांगितले. त्यानंतर पोलिसांना या घटनेबाबत कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
सागर याच्या पश्चात आई, भाऊ, विवाहित बहिणी असा परिवार आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार मनोज गुरव करत आहेत.