🔱आभाळागत माया तुझी.. आम्हांवरी राहू दे..!🙏
वात्सल्याची मूर्ती..चैतन्याची स्फूर्ती ..!
मांगंल्याची सावली…आई सातेरी माऊली..!!
🚩⭕⚜️⚜️⚜️-🔱⚜️⚜️⚜️⭕🚩
खरंतर पणदूर हा गाव तुलनेने व लोकसंख्येने तसा छोटा…मात्र आज गावकऱ्यांनी ग्रामदैवत श्री देवी सातेरी आई सहित परिवार देवतांच्या पाषाणांची स्वागतयात्रा ज्या भव्य दिव्यतेने पार पाडली ते पाहता “सुखावले मन लागलीसे गोडी” अशीच काहीशी भावना मनात घर करून आहे. तसं पाहता वेताळ बांबर्डे गावचे ग्रामदैवत श्री वेतोबा व पणदूर गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी नात्याने बहीण भाऊ आहेत अशी आख्यायिका आहे. ‘सोनियाचा योग म्हणावा की दैवी इच्छा म्हणावी, दोन्ही ग्रामदेवतांचा जिर्णोद्धार व मंदिर कलशारोहण सोहळा एकाच वर्षात अगदी लगतच्या कालावधीत पार पडतोय हे सारेच विलक्षण म्हणावे लागेल.संपूर्ण गावात गुढ्या उभारून आजपासून भक्तिमय आनंदोत्सव साजरा केला जातोय ,ज्याचा शुभारंभ झालेला आजच्या भव्य दिव्य स्वागत यात्रेतून दिसून आला. महिला पुरुषांचा पारंपरिक पोशाख, प्राचीन काळासारखा यात्रेसाठी बैल गाड्या, महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, अध्यात्मरुपी देवतांची प्रतिरूपे दर्शवणारी वेशभूषा, ढोल ताशांचा गजर आणि त्यात टाळ व लेझीम हाती घेऊन देहभान हरपून देवाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणारे ग्रामस्थ हे सारंच काही विलक्षण होतं जे खरंच मनाला भावलं.!
आई सातेरी देवी ही मातृशक्तीचे तेजस्वी रूप असून तिला नागकन्या म्हणून संबोधलं जातं, आणि म्हणूनच सातेरी देवीच्या मंदिरात वारुळाला महत्व आहे. दरवर्षी कितीही महापूर आला तरी वारुळरूपातील सातेरी ही अढळ स्वरूपात भक्तांवर सावली ठेवून बसलेली आहे.कर्ली नदीच्या तीरावर वसलेले सातेरी देवीचे मंदिर जसे पणदूर वासियांचे श्रद्धास्थान आहे अगदी तसेच ते समस्त वेताळ बांबर्डे वासियांचे देखील श्रद्धास्थान आहे. म्हणूनच उत्सवाच्या दरम्यान श्री वेतोबा देवाची पालखी प्रदक्षिणा पार पडत असताना सातेरी माऊलीला नारळ अर्पण करण्याची पद्धत रूढ आहे.देवी सातेरी आईच्या जिर्णोद्धार सोहळ्याच्या निमित्ताने पणदूर वासियांनी दाखवलेली एकजूट ही लक्षणीय असून पुढील पाच दिवस चालणारा उत्सव नक्कीच डोळ्यांचे पारणे फेडणारा असणार आहे ह्यात शंका नाही.आई सातेरी सर्वांच्या मनोकामना पूर्ण करोत अशी प्रार्थना करतो.🙏
“माझ्या सातेरी मातेची काय सांगू महती..
वर्णिता तिची ख्याती…शब्दही अपुरे पडती..!”
-प्रसाद गावडे✍🏻🙏













