मालवण येथील नवीन बस स्थानकासाठी माजी आमदार वैभव नाईक यांचेच विशेष प्रयत्न
संतोष हिवाळेकर / मालवण
मालवण बस स्थानक येथील काही दिवसापूर्वी जुन्या इमारतीचा काही भाग कोसळून एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली होती. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर आणि पदाधिकारी यांनी आगार व्यवस्थापक यांना अजून किती प्रवासी जखमी होत राहणार आहेत? किती प्रवासी यांचे प्राण जाण्याची वाट बघत आहात? असा जाब विचारण्यात आला होता. जीर्ण झालेली इमारत जर दोन दिवसांत पाडली नसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्टाईलने जुनी इमारत पाडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला होता. याबाबतची दखल घेत जुन्या इमारत पाडण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात देखील करण्यात आली आहे. या स्थानकाच्या नवीन इमारतीसाठी माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी विशेष प्रयत्न करून निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व महायुती सरकार यांच्या दिरंगाईमुळे हे काम वेळेत पूर्ण न झाल्याचे देखील दिसत आहे आणि यामुळेच येथील एस टी प्रवासी, एस टी कर्मचारी यांना सुद्धा नाहक त्रास होत आहे. यावेळी स्थानिक प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही करता येईल ते लवकरात लवकर करा अशा देखील सूचना देण्यात आल्या आहेत.













