कुडाळ पोलीस आपली कामगिरी चोख पार पाडत आहेत

धीरज परब यांच्या आरोपांवर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे स्पष्टीकरण

कुडाळ : कुडाळ पोलीस आपली कामगिरी चोख पार पाडत असून धीरज परब यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कुडाळमधून होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीची माहिती पोलिसांना सहा महिन्यांपूर्वीच दिली असून पोलिसांनी याबाबत गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. कुडाळ एम.आय.डी.सी. येथील एका कंपनीमध्ये बेकायदेशीररित्या परप्रांतीय कामगारांचा वावर असून या ठिकाणी अमली पदार्थ असण्याची शक्यता असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच याबाबतची सर्व चौकशी व्हावी अशी मागणी मनसेने निवेदनाद्वारे केली असल्याचे धीरज परब यांनी म्हटले होते.

यावर स्पष्टीकरण देताना पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी म्हटले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून फक्त परप्रांतीय कामगारांच्या चौकशी बाबतचे निवेदन देण्यात आले असून यामध्ये अंमली पदार्थांबाबत कोणताही उल्लेख नव्हता. तसेच एमआयडीसी मधील त्या कंपनीच्या कामगारांची चौकशी केली असून एकूण ११ कामगारांची माहिती कंपनीच्या मालकाने दिली. या सर्व कामगारांच्या चौकशीमध्ये कोणतीही आक्षेपार्ह माहिती न मिळाल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी म्हटले आहे. तसेच अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले असून हे पथक अंमली पदार्थांच्या विरोधात सज्ज असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!