वेंगुर्ला : म्हापण येथील सीताराम संजीवनी आश्रमाला कोचरा येथील विविध अश्रमांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या अनमोल मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी आश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांच्या संकल्पनेतून सन्मानाचा एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
यावेळी उपस्थित सर्व महिलांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर संस्थेचे अध्यक्ष साबाजी पाटील आपले मनोगत व्यक्त केले. २००४ पासून या आश्रमाची इमारत या ठिकाणी उभी होती. परंतु या आश्रमाचे खरे काम २०२४ पासून सुरू झाले. या २० वर्षांच्या काळात या आश्रमाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. असे त्यांनी यावेळी सांगितले. या जगात चांगले आणि वाईट असे काही नसते जर एखादी गोष्ट वाईट असेल तर पिढ्यानपिढ्या एखादी गोष्ट टिकली नसती असे उदाहरण त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
यानंतर सीताराम संजीवनी आनंदाश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपला जीवनप्रवास सांगितला. या क्षेत्रात आल्यानंतर सुरवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आजारी वयोवृद्ध रुग्णांची सेवा करताना सुरवातीला महिला तयार होत नव्हत्या त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता जाणवत होती. शिवाय इमारत उपलब्ध नसल्यामुळे एवढ्या रुग्णांच्या राहण्याची व्यवस्था कशी करायची हा देखील मोठा प्रश्न होता. अशा एक ना अनेक समस्यांचा सामना करत त्यांनी प्रामाणिकपणे आपले कार्य सुरू ठेवले. अथक प्रयत्नानंतर त्यांच्यासमोर सीताराम संजीवनी आनंदाश्रम हा पर्याय उपलब्ध झाला आणि रुग्णांच्या राहण्याची समस्या मिटली. आज १८ महिला त्यांच्या हाताखाली काम करत असून त्यांचे काम प्रामाणिकपणे सुरू आहे. अनेक रुग्ण त्यांच्याकडून उपचार घेत आहेत. त्यातील काहीजण बरे होऊन स्वतःच्या पायावर चालत आहेत. आपल्या सर्व यशाचे श्रेय त्यांनी आपले वडील आणि पतीला दिले. “यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते ” असे म्हणतात पण “मी अशी स्त्री आहे जिच्या पाठीशी जिच्या मागे पाठीशी एकापेक्षा दोन पुरुष खंबीरपणे उभे राहिले ” हे सांगताना त्या चांगल्याच भावूक झाल्या. यावेळी उपस्थित सर्व महिलांनी त्यांचे मुक्तकंठाने कौतुक केले.
या प्रसंगी कोचरा गावातून स्वामीनी ग्रामसंघाच्या सर्व महिला उपस्थित होत्या. तसेच संस्थेच्या आरोग्य सेविका सानिका तुळसकर, अध्यक्ष साबाजी पाटिल, संस्थेचे खजिनदार राजन धुरी, अशोक पाटकर, वालावलकर मॅडम गोविलकर मॅडम, श्याम तुळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.













