चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळ आयोजित नृत्य सन्मान सोहळा २०२५ उत्साहात संपन्न

सुप्रसिद्ध कोरियोग्राफर आशिष पाटील यांची विशेष उपस्थिती

कुडाळ : चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातील पुरस्कार वितरणाचा सर्वात मोठा अवॉर्ड शो शनिवारी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते तथा नेहा फिशरीजचे सर्वेसर्वा जितेंद्र सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर लावणीकिंग आशिष पाटील, नागराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, नगरसेविका नयना मांजरेकर, सौ. रुपाली शिरसाट, सागर माळकर, एकनाथ माळकर, एकनाथ पिंगुळकर, नागेश नाईक, संजना परब, सौ. बिर्जे, किरण कुडाळकर, सतीश पावसकर, चिमणी पाखरंचे सल्लागार सुनील भोगटे, अध्यक्ष रवी कुडाळकर, नृत्यांगना दीक्षा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध कोरियोग्राफर आशिष पाटील उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील कलाकारांचा सन्मान मंचावर करण्यात आला. या शो पाहण्यासाठी जिल्हाभरातील कलाप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

कार्यक्रमाच्या सुरवातीलाच चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेमुळे कार्यक्रमाला दणक्यात सुरुवात झाली. भव्यदिव्य असा रंगमंच, विद्युत रोषणाई, एल.ई. डी. स्क्रीन वॉल यांच्या साथीला असणाऱ्या नृत्याच्या ठेक्यामुळे दर्शक भारावून गेले.

यावेळी सुप्रसिद्ध कोरियोग्राफर आशिष पाटील यांना नृत्य करताना प्रत्यक्षात पाहण्याचा मोह प्रेक्षकांना काही आवरता आला नाही. यावेळी केवळ दर्शकांच्या ईच्छेसाठी आशिष पाटील यांनी रंगमंचावर नृत्य सादर केले. सिंधुदुर्गकन्या तथा सुप्रसिद्ध नृत्यांगना दीक्षा नाईक व आशिष पाटील सर यांना एकसाथ नाचताना प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य कुडाळवासियांना चिमणी पाखरं डान्स अकॅडमीमुळे प्राप्त झाले.

यानंतर पत्रकार निलेश जोशी व नृत्यांगना मृणाल सावंत यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पत्रकार निलेश जोशी यांनी रवी कुडाळकर व चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या टीमचे भरभरून कौतुक केले.

यावेळी आशिष पाटील सर यांच्या जीवनसंघर्षाची एक संक्षिप्त चित्रफीत एल. ई. डी. वॉलवर सादर करण्यात आली. कोकणवासीयांनी दिलेला मानसन्मान व प्रेम पाहून आशिष पाटील सर देखील चांगलेच भारावून गेले.

चिमणी पाखरं डान्स अकॅडमी व संचालक रवी कुडाळकर यांनी केलेल्या नियोजन पाहून सर्वांनीच गौरवोद्गार काढले. सर्व क्षेत्रातील विविध कलाकारांचा सन्मान केल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी कुडाळकर व राहुल कदम यांनी केले.

error: Content is protected !!