कवठी खून प्रकरणातील अन्य दोघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील कवठी अन्नशांतवाडीयेथील संदीप उर्फ बाळा दामोदर करलकर (वय ४२) याच्या खून प्रकरणातील फरार असलेले रामचंद्र उर्फ दादा दत्ताराम करलकर (वय ४०) व शैलेश दत्ताराम करलकर (वय ४३, दोघेही रा. कवठी वाडीवाडा) या दोघांना चेंदवण-निरुखेवाडी येथून निवती पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आज सायंकाळी अटक केली. या दोघांना सोमवारी कुडाळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या खून प्रकरणात सहभागी असलेल्या श्यामसुंदर प्रभाकर वाड्येकर याला पोलिसांनी यापुर्वीच अटक केली आहे. आता खून प्रकरणातील आरोपींची संख्या तीन झाली आहे.

काजूच्या बागेत जाऊन काजू चोरून उलट वडिलांना व कामगाराला धमकावल्याच्या रागातून जाब विचारण्यासाठी दादा करलकर, शैलेश करलकर व कामगार शामसुंदर वाड्येकर हे संदीप करलकर यांच्या घरी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गेले असता त्यावेळी या दोन गटात झालेल्या मारामारीत संदीप करलकर याला दादा करलकर, शैलेश करलकर व शामसुंदर वाड्येकर या तिघांनी मारहाण केली होती. या माराहाणीत संदीप करलकर जखमी झाला होता. त्याचा मानेचा मणका तुटल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला व त्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. आता या घटनेनंतर कोणीही पोलीस यंत्रणेला कळवले नाही. शुक्रवार दि.२८ रोजी याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. संदीप करलकरच्या खुनात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी या दोघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. तर तीनही आरोपींकडे तपास करताना आणखी कोणी सहभागी होते का? याचा तपास पोलीस करणार आहेत.

error: Content is protected !!