श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेत मराठी राजभाषा दिन जल्लोषात साजरा

मालवण : श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेत मराठी राजभाषा दिन जल्लोषात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात ‘जय शारदे वागेश्वरी’या प्रार्थनेने झाली.

मराठी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या साहित्याचा आढावा घेत मराठीतील साहित्याचा आस्वाद घेतला. यामध्ये कथा, स्वरचित कविता,अभंग, भारूड, गौळण, छक्कड, लावणी, कीर्तन, गोंधळ,भावगीत, भक्तीगीत इ. साहित्य विद्यार्थ्यांनी अप्रतिम सादर केले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘एकपात्री अभिनय’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कुमारी सिया सचिन पाताडे हिचा अभिनय लक्षवेधी ठरला.या स्पर्धेची ती प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. तर कुमारी वैदेही वामन लाड -द्वितीय क्रमांक,कुमार वेदांत श्रीकांत घाडीगावकर -तृतीय, कुमारी नेहा सतीश पालव व कुमार संदीप पाताडे -उत्तेजनार्थ असे अनुक्रमे क्रमांक काढण्यात आले.या सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशास्तिपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली होती. त्या साहित्याचे प्रदर्शन मांडण्यात आले. ‘शैक्षणिक साहित्य निर्मिती’ स्पर्धेत कुमारी आयेशा आनंद देसाई- प्रथम क्रमांक, कुमारी श्रावणी महेश सावंत -द्वितीय क्रमांक, वैदेही वामन लाड- तृतीय क्रमांक असे अनुक्रमे क्रमांक काढण्यात आले.


या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा.श्री अभिमन्यू अर्जुन कवठणकर (सहखजिनदार -भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबई )हे लाभले.त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.त्यांनी मुलांच्या कलागुणांचे भरभरून कौतुक केले. व त्यांना बक्षीस स्वरूपात भेटवस्तू दिल्यात. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देत आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करून आपले भविष्य उज्वल करावे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्रसाद कुबल यांनी मराठी भाषेचा इतिहास सांगत विद्यार्थ्यांना भाषेचे महत्व पटवून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणबद्दल त्यांचे अभिनंदन केले.या कार्यक्रमसाठी सौ. सोनाली सचिन पाताडे (अध्यक्षा -माता पालक संघ ), सौ. पूर्वा पाटकर (अंगणवाडी सेविका)या उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे प्रशालेचे माजी विद्यार्थी, प्रशालेच्या शिक्षिका सौ.वेदिका दळवी, कु.शलाका शिंदे या उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशालेच्या मराठी विषयाच्या शिक्षिका प्रतिभा केळूसकर यांनी केले.

error: Content is protected !!