महिला जिल्हा संघटक पदासहित पक्ष सदस्य पदाचा राजीनामा
सिंधुदुर्ग- महायुती मधून रासपने काढता पाय घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात रासपाला पहिला धक्का सोनाली ताई फाले यांच्या माध्यमातून मिळाला आहे. सौ फाले यांनी महिला जिल्हा संघटक पदासहित पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत रासप पक्षाला राम राम ठोकला आहे. लोकसभेत महायुतीचे उमेदवार खासदार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ रासपने चांगली आघाडी घेतली होती. जिल्ह्यात रासपामध्ये उत्सवाचे वातावरण होते. विधानसभा पार्श्वभूमीवर महायुतीतून रासपचे महादेव जानकर यांनी काढता पाय घेतला असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रासप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सुर उमटत आहेत. यामुळेच महिला संघटक सोनाली फाले यांनी आपल्या पदासहित पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचे देखील स्पष्ट केले आहे. सोनाली फाले आता आपल्या हाती शिवसेनेची मशाल घेणार की भाजपचे कमळ घेणार हे काही दिवसात स्पष्ट होईल.