तारकर्लीच्या समुद्रात बुडून पुण्याच्या दोन युवकांचा मृत्यू

पुणे हडपसर येथून आले होते पर्यटनाला

मालवण : पुणे हडपसर येथून तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी सकाळी ११.२० वाजण्याच्या सुमारास तारकर्ली पर्यटन केंद्रानजिकच्या समुद्रात घडली आहे. या दुर्घटनेतील एका युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोहित बाळासाहेब कोळी (२१) व शुभम सुनील सोनवणे (२२) दोन्ही रा. हडपसर, हवेली पुणे अशी मृतांची नावे आहेत.

हवेली तालुक्यातील कुश संतोष गदरे (२१), रोहन रामदास डोंबाळे, (२०), ओंकार अशोक भोसले (२४) उपचार, रोहित बाळासाहेब कोळी (२१) मयत, शुभम सुनील सोनवणे (२२) मयत हे युवक मालवण तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलें होते. सकाळच्या सुमारास तारकर्ली पर्यटन विकास महामंडळाच्या नजीक असलेल्या समुद्रकिनारी हे युवक समुद्र स्नानासाठी पाण्यात उतरले होते. यावेळी अचानक पाण्याच्या खोलीचा व लाटांचा अंदाज न आल्यामुळे पोहत असलेल्या युवकांपैकी ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे हे युवक पाण्यात ओढले गेले. किनाऱ्यावरील स्थानिकांनी तसेच पर्यटन व्यवसायिकांनी तात्काळ समुद्राच्या पाण्यात बचाव कार्य सुरू केले. बोटीच्या सहाय्याने बुडालेल्या युवकांचा पाण्यात शोध कार्य सुरू करण्यात आले. अखेर स्थानिकांकडून समुद्राच्या पाण्यात शोधकार्य सुरू असताना बुडालेल्या अवस्थेत तीनही युवक सापडून आले. त्यांना तात्काळ किनाऱ्यावर आणल्यावर रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान डॉक्टर आणि तपासणी केली असता रोहित कोळी व शुभम सोनवणे यांना मयत घोषित केले. मात्र ओंकार भोसले हा अत्यवस्थ असून त्याच्यावर अधिक उपचार करण्या साठी त्याला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. बचाव कार्यात समीर गोवेकर, वैभव सावंत, दत्तराज चव्हाण, महेंद्र चव्हाण, रांजेश्वर वॉटर स्पोर्ट चे कर्मचारी सामील होते. याबाबत मालवण पोलिसात तपास करीत आहेत.

error: Content is protected !!