माजी नगराध्यक्ष आफरीन करोल यांनी सुनावले…
महाविकास आघाडीत असतानाची खदखद पडली बाहेर…
कुडाळ : काँग्रेस पक्षातून आम्ही स्वतःहून बाहेर पडलो. त्यामुळे आमची हकालपट्टी झाल्याचे जिल्हा अध्यक्ष इर्शाद शेख कसे काय म्हणू शकतात, असा सवाल काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कुडाळच्या माजी नगराध्यक्ष आफरीन करोल यांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे इर्शाद शेख भाजपच्या नगरसेविकेला सहकार्य करायला सांगतात आणि दुसरीकडे आम्ही पैशाला बळी पडल्याचं बोलतात. त्यामुळे इर्शाद शेख यांनी पहिलं आत्मपरीक्षण करावं आणि नंतर आमच्या वर आरोप करावेत असं आफरीन करोल यांनी सांगितलं. यावेळी माजी नगराध्यक्ष अक्षता खटावकर उपस्थित होत्या.
माजी नगराध्यक्ष आफरीन करोल म्हणाल्या, आपल्याला व अक्षता खटावकर या आम्हा दोघांना नगराध्यक्षपदाचा जो बहुमान मिळाला तो, काँग्रेसचे नेते माजी गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या मुळेच मिळाला आहे. त्यांचे ऋण आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. त्यांच्यावर आमचा कोणताही रोष नाही. मात्र स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व नेत्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले. नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत आम्ही आमिषांना बळी न पडता महाविकास आघाडीलाच मतदान केले. नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर आम्हाला कोणीही सहानुभूतीपूर्वक आधार दिला नाही. महाविकास आघाडीतील एक नगरसेविका फुटून सत्ता पालट होणार याची चर्चा सुरु असतानाही काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी कोणताही सिरियसपणा घेतला नाही. त्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत पराभव झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो तेव्हा महाविकास आघाडीचा एकही नेता किवा पदाधिकारी तेथे उपस्थित नव्हता. जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष या सर्वानीच आम्हाला वा-यावर सोडले. म्हणूनच आम्ही शहर विकासासाठी भाजपात गेलो आहोत. माझी व अक्षता खटावकर यांची कॉग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी हकालपट्टी केलेली नसून, आम्ही स्वतःहूनच अगोदरच भाजपात गेलो आहोत. त्यांनी हकालपट्टी केल्याचा फक्त स्टंट केला आहे. कॉग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्याशी नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीसंदर्भात चर्चा करताना ते आम्हाला म्हणाले की, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगराध्यक्ष बसवायचा आहे. त्यांचं ते बघून घेतील. आपण फक्त त्यांना साथ द्यायची आहे, ते ज्या उमेदवाराला मतदान करायला सांगतील त्या मतदाराला उमेदवाराला आपण मतदान करायचं आहे. त्याप्रमाणे आम्ही त्यांना साथ दिलीच तशीही आताही त्यांना साथ दिली. मग आम्ही कोणता गुन्हा केला का?. आमच्यावर आरोप करणा-यांनी ठाकरे सेनेचे पाच आणि काँग्रेसचे दोन असे एकूण सात नगरसेवक का फुटले? याचे आत्मपरीक्षण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करावे, असे आव्हान आफरीन करोल यांनी दिले आहे.













