कणकवली : अवैध धंद्यांबाबत पालकमंत्री नीतेश राणे यांनी कडक भूमिका घेताच पोलिसांसह संबंधित यंत्रणांकडून या धंद्यांवर अंकुश आणल्याचे दाखविण्यात येत आहे. मात्र, काही प्रमाणात मटका व राजरोस मिळणारा गुटखा खुलेआम मिळत नसला, तरीही ऑनलाईन लॉटरीचे केंद्र असलेल्या कणकवलीत ‘गेम च्या नावाखाली हा धंदा याच यंत्रणांच्या आशीर्वादाने सुरू आहे. तर दुसरीकडे अनेक गावांमध्ये गोवा बनावटीची दारूही राजरोस सुरू असल्याचे दिसून येते. दारू, मटका, जुगार, अंमली पदार्थ, गुटखा, ऑनलाईन लॉटरी, व्हीडिओ गेम आदींबाबत पालकमंत्री नीतेश राणे यांनी कडक भूमिका घेत पोलिसांसह संबंधित यंत्रणांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गेले काही दिवस कणकवली शहरातील मटक्यावर काही टक्के कंट्रोल आणल्याचे दाखविण्यात येत आहे.
तसेच छोट्या स्टॉल्सवर मिळणाऱ्या गुटख्यावर बंधन आले असले, तरीही या गुटख्याचा दर वाढवून विक्री सुरु आहे. कणकवलीत या गुटख्याचा होलसेलमध्ये व्यापार करणाऱ्यांकडे हीच यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.
एकीकडे ही वस्तुस्थिती असताना याच यंत्रणेच्या आशीर्वादाने ऑनलाईन लॉटरी शहरात बिनधास्तपणे सुरू आहे. मुळात गेमच्या नावाखाली ही लॉटरी चालविणारे मुख्य केंद्रच कणकवलीत असून शहरात काही स्टॉल्सवर हे गेम सुरू असल्याचे दिसते. जिल्हयात सुमारे ८० च्या जवळपास स्टॉल्सवर कणकवली येथील केंद्रावरून या ऑनलाईन लॉटरीवर कंट्रोलसह यातील कमिशन वसुलीसाठी कर्मचारीही नियुक्त असल्याचे समजते. एकिकडे शहरात ही लॉटरी खुलेआम सुरू असतानाही जबाबदार यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करण्यामागे नेमके ‘वास्तव’ काय, असा सवाल करण्यात येत आहे. अनेक गावांमध्ये गोचा बनावटीची दारू विक्री केली जाते. गावपातळीवरील ‘बिट’ सांभाळणाऱ्यांना या साऱ्याची पुरेपूर कल्पना आहे. मात्र, त्याकडेही डोळेझाक करण्यात येत आहे.
या एकूणच निर्वावलेल्या यंत्रणांना काबूत आणून हे अवैध ‘मिळकती’ चे धंदे बंद करण्यासाठी पालकमंत्र्यांनी पावले उचलली असली, तरीही त्यांना अजून कडक भूमिका घेऊन प्रसंगी यातील जबाबदार यंत्रणांवरही कड़क लक्ष ठेवाचे लागणार आहे.













