महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे व सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ मर्या. सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ मर्या. सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मजूर सहकारी संस्थांचे संचालक व सेवक यांचेसाठी संघाचे कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमास मजूर सहकारी संस्थांचे संचालक व सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये इनकम टॅक्स विषयी चार्टर्ड अकाऊंटंट श्री. सुनिल सौदागर, जीएसटी संदर्भात चार्टर्ड अकाऊंटंट श्री. युगांत चव्हाण, सहकारी संस्थांची हिशोबाची पत्रके व लेखा परीक्षण वर्गवारी याबाबत तात्यासाहेब मोहिते प्रशिक्षण केंद्र कोल्हापूरचे निवृत्त प्राचार्य श्री. के. बी. कुंभार यांनी तर संचालक व सेवक हक्क कर्तव्य व जबाबदारी याबाबत सहकारी मंडळाचे जिल्हा सहकार विकास अधिकारी श्री. एम. आर. पांचाळ यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना सविस्तर सखोल माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. त्याचप्रमाणे मजूर संघाचे अध्यक्ष श्री विठ्ठल देसाई तसेच व्यवस्थापक श्री. जी.टी. कदम यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
संस्थांच्या बिलातून कपात करुन घेण्यात आलेला इनकम टॅक्स तसेच जीएसटी संबंधित खात्यांनी भरणा न केल्यास त्याबाबत संस्थांनी जीएसटी व इनकम टॅक्स कार्यालयाकडे दाद मागावी असे श्री. सौदागर व श्री. चव्हाण यांनी सांगितले. संस्थांनी कामाच्या रक्कमेतील मजूरीच्या रकमेवरील जीएसटी भरणा करणे आवश्यक आहे. बदललेल्या करप्रणालीचे ज्ञान संस्थांनी आत्मसात करणे गरजेचे आहे असे श्री. युगांत चव्हाण यांनी सांगितले. सहकारी संस्थांची गुणात्मक वाढ होण्यासाठी सहकारी संस्थेतील संचालक व सेवक प्रशिक्षित असणे गरजेचे आहे असे श्री. के. बी. कुंभार यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत श्री. एम. आर. पांचाळ यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार संघाचे व्यवस्थापक श्री. जी.टी. कदम यांनी मानून उपस्थित प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाला संघाचे उपाध्यक्ष श्री. आत्माराम बालम संचालक श्री. बाबा आंगणे, श्री. संदीप सावंत, श्री. अनिल कोरगांवकर, श्री. श्रीकांत राणे, श्री. संतोष परब, श्री. आत्माराम ओटवणेकर, श्री. जयेश धुमाळे, सौ. मेघा जिकमडे, सौ. प्रणाली मसुरकर उपस्थित होते.