आमदार निलेश राणे यांचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांना निवेदन
ठाकर समाजाच्या होणाऱ्या जात पडताळणी प्रक्रियेत विलंब होत असल्याच्या तक्रारी आमदार निलेश यांना प्राप्त होत्या. ठाकर समाजातील विद्यार्थी, लोकनियुक्त प्रतिनिधी, नोकरवर्ग यांना केवळ आर्थिक अपेक्षा ठेवून विभागीय आयुक्त पावरा हे जाणीवपूर्वक त्रास देत होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या बदलीची मागणी आमदार निलेश राणे यांनी सामाजिक न्याय मंत्री मा. संजय शिरसाट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जात पडताळणी समितीचे काम अत्यंत दिरंगाईने व अडवणुकीने सुरू असुन त्याचा त्रास येथील लोकप्रतिनिधी, ठाकर समाजातील विद्यार्थ्यांना व शासकीय कर्मचा-यांना होत आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती (सह आयुक्त) कोकण विभाग श्री. दिनकर पावरा हे जाणीवपूर्वक अडवणुक करून जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत दिरंगाई करत असल्याने त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी येत असून त्यांच्या या वृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नुकसान होत आहे.
तरी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती सह आयुक्त कोकण विभाग श्री. दिनकर पावरा यांची तातडीने बदली करुन सक्षम अधिका-याची नियुक्ती करण्यास निर्देश द्यावेत अशी मागणी आ. निलेश राणे यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केली आहे.














