रॅगिंग प्रकरणी “त्या” पाच मुलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल…

सावंतवाडी पोलिसांची कारवाई; मुख्याध्यापकासह, रेक्टर मदतनिसावर ठपका…

सावंतवाडी : सह्याद्री पट्ट्यातील एका शासकीय शाळेत रॅगिंग केल्याप्रकरणी अखेर सावंतवाडी पोलिसांनी मुख्याध्यापकासह रेक्टर व मदतनीस याच्यासह हे कृत्य करणा-या पाच अल्पवयीन विद्यार्थ्यांवर रॅगिंग प्रतिबंध आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची तक्रार अत्याचार ग्रस्त विद्यार्थ्यांच्या आईने केली आहे. त्यानुसार रात्री उशिरा हा गुन्हा दाखल केला. याबाबत सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दुजारा दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सावंतवाडी तालुक्यात असलेल्या एका शासकीय प्रशालेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांना त्यांच्याच वरच्या वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांकडून रॅगिंगचा प्रकार करण्यात आला होता. यात झाडु मारायला सांगणे, कचरा उचलायला लावणे, जेवणाचे ताट उचलायला लावणे, अशा प्रकारचा समावेश होता. दरम्यान या प्रकरणी त्या मुलांनी आई- वडिलांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पालकांनी शिक्षक पालक संघाच्या समितीत तक्रार केली. त्यानंतर त्या पाचही मुलांना रस्टीकेट करण्यात आले होते. परंतु त्यांना परिक्षेसाठी पुन्हा घेण्याची तयारी प्रशाले कडून दर्शवण्यात आली. परंतु या प्रक्रियेला मुलांसह पालकांनी विरोध केला होता. तसेच काही झाले तरी त्यांना पुन्हा घेण्यात येऊ नये. त्यांना शाळेतून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. मात्र याबाबतचे अधिकार हे शाळेला नसून जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. असे सांगून मुख्याध्यापकांनी याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यामुळे पालक नाराज होते. अखेर संतप्त झालेल्या पालकांनी काल रात्री उशिरा पोलिसांकडे रितसर तक्रार दिली. त्यानुसार आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅगिंग करणाऱ्या पाच अल्पवयीन विद्यार्थी यांच्यासह माहिती लपवल्याप्रकरणी तसेच कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मुख्याध्यापक, रेक्टर आणि मदतनीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!