आयटी क्षेत्रात काम करत असलेल्या शुभदाचा बॉयफ्रेंड ने केला खून
आर्थिक फसवणुकीमुळे खून:व्हिडिओ व्हायरल
चिपळूण: चिपळूणमधील तरुणीबरोबर प्रेमप्रकरण आणि पैशाच्या व्यवहारातून पुणे येथे खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शुभदा शंकर कोदारे (28, मूळ चिपळूण, स्थायिक कराड, नोकरीनिमित्त पुणे, बालाजी नगर, कात्रज) असे खून करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे तर कृष्णा सत्यनारायण कनोजा (28, रा.खैरैवाडी, शिवाजीनगर, मूळ यूपी) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या घटनेचेे चिपळुणात पडसाद उमटले आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार मृत तरूणी शुभदा कोदारे आणि आरोपी कृष्णा एकाच कंपनीत काम करायचे. वडील आजारी असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे असे सांगत शुभदाने अनेक वेळा कृष्णाकडून पैसे घेतले होते. कधी 25 दहजार तर कधी 50 हजार रुपये अशी रक्कम घेत तिने त्याच्याकडून सुमारे 4 लाख रुपये घेतले होते. त्यानंतर तिने त्याच्याकडे पुन्हा पैसे मागितल्याने कृष्णाला तिचा संशय आला.अडीच महिन्यांपूर्वी त्याने थेट कराड गाठून तिच्या वडिलांची भेट घेतली. त्यावेळी आपले पैसे शुभदाने वडिलांच्या उपचारांच्या नावाखाली अन्यत्र वापरल्याचे समजले. तिचे खोटे बोलणे कृष्णाच्या जिव्हारी लागले. आपण कष्टाने कमावलेले पैसे तिने खोटे बोलून आपल्याकडून घेतले, हे त्याला समजून चुकले होते. त्यातूनच कृष्णा याने शुभदाला धडा शिकविण्याचे मनाशी ठरवले. मंगळवारी येरवडा येथील डब्ल्यूएनएस कंपनीच्या पार्किंगमध्ये सायंकाळी 6 वाजता कृष्णा याने तिच्यावर धारदार हत्याराने सपासप वार केले. हे वार इतके जोरदार होते की त्यात शुभदाच्या हाताच्या नसा पूर्णपणे तुटल्या. तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र, मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि कार्डियाक अॅटॅक येऊन त्यातच तिचा मृत्यू झाला.













