शरद पवारांच्या गोटात बड्या नेत्याचा पक्ष प्रवेश
इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी दिल्यानंतर शरद पवारांच्या तुतारी एक्स्प्रेसची दिशा निश्चित झालीय. येत्या 14 ऑक्टोबरला सातारच्या फलटणमध्ये असाच मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय. रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाणांचं ठरल्याचं स्वतः शरद पवारांनीच जाहीर केलंय.
इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या हातात तुतारी दिल्यानंतर आता फलटणमध्ये अजित पवारांना धक्का देण्याची तयारी शरद पवारांनी केलीय. त्यासाठी 14 ऑक्टोबरचा मुहूर्तही काढण्यात आलाय. विधान परिषदेचे माजी सभापती दिग्गज नेते रामराजे नाईक निंबाळकर हे तुतारी घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी फुटल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांसोबत राहिले. खरं तर हा शरद पवारांसाठी मोठा धक्का होता. अजित पवार महायुतीत असूनही साताऱ्यात भाजपच्या नेत्यांकडून रामराजेंना त्रास दिला गेला. त्याचेच पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटले. रामराजेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात उघड भूमिका घेतली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हातात तुतारी घेण्याचे संकेत दिलेत.