मुंबई : अखिल मुंबई प्रासादिक भजन मंडळ, मुंबई आयोजित पहिली सभा सन्माननीय श्री.संजय गावडे बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्माननीय श्री. वाळवे बुवा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सन्माननीय श्री. पांडुरंग सावंत बुवा यांच्या नियोजनाने अतिशय अर्थपूर्ण आणि नियोजनबद्ध, सुत्रबद्ध, शिस्तबद्ध आणि उद्दीष्ट प्रेरक संपन्न झाली.अनेक बुवांनी आपले विचार मांडले. ऐक्याचा महामेरू निर्माण करण्याच्या उद्देशाने वाटचाल करण्यासाठी आपण सज्ज होणार आहोत असा आविर्भाव सर्वांच्याच चेह-यावर होता.
सन्माननीय श्री. संजय गावडे बुवा यांनी या मंडळाची ध्येय धोरणे सर्वांना समजावून सांगितली.या सभेला कोकण भजन संस्कृती,परंपरा जपणारे नामवंत भजनी बुवा, पखवाज वादक उपस्थित होते. भजन संस्कृतीची जपणा-या नवोदित शिकाऊ पखवाज,भजनी बुवा यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मंडळ सर्वस्वी कटिबद्ध राहील याची ग्वाही सन्माननीय श्री. संजय गावडे बुवा यांनी दिली. तसेच आजची सभा सन्माननीय श्री. वाळवे बुवा यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आली.नवनवीन भजनी कलावंत, पखवाज वादक, दशावतारी कलावंत हे मंडळाचे सदस्य म्हणून एकत्र करून सांस्कृतिक कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी ही सांस्कृतिक ऐक्याची चळवळ निर्माण करण्याच्या उद्देशाने आपण सर्वांनी मिळून हे मंडळ कार्यरत करुया असे एकमताने मान्य करण्यात आले.प्रत्येक कलावंताला मेडिक्लेम बद्दल तसेच अनेक शासनाच्या योजना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. प्रतिभावंत कलावंताला दरवर्षी सन्मानचिन्ह आणि पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे. मंडळाची स्वतःचे मुंबईमध्ये कार्यालय उभे करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तालुकावार मंडळाचे तालुका प्रमुख नेमण्यात येणार आहेत.
आजच्या सभेसाठी बहुसंख्य भजनी कलावंत उपस्थित होते. सर्वांच्या मनात सामाजिक ऐक्याची भावना व्यक्त होत होती. आपल्या सिंधुदुर्गाची भजनी संस्कृती, परंपरा, रितीरिवाज जतन आणि संवर्धन करण्यासाठी कोकणी कलावंत एकवटले होते.