प्रसाद गावडे यांची बोचरी टीका
ओरोस प्रतिनिधी : कोकणात सद्ध्या राजकीय वर्तुळात एकमेकांवर दावे प्रतिदावे जोरजोरात सुरू आहेत. राजकीय रिंगणात विधानसभा निवडणूक बिगुल वाजल्यापासूनच अनेक नाट्यमय खेळी पाहायला मिळाल्या आहेत..आरोप प्रत्यारोपांच्या या मैदानात आता प्रसाद गावडे यांनी देखील बड्या नेत्यांवर ताशेरे ओढले आहेत.
निलेश राणेंचा समजूतदारपणा कळण्या एवढा शहाणपणा उबाठा कार्य कर्त्यांमध्ये नाही
यावेळी ते म्हणाले, महायुतीचे उमेदवार निलेश राणेंनीउमेदवारी अर्ज भरताना दाखवलेला समजूतदारपणा कळण्याएवढं “शहाणपण” उबाठा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही हे दुर्दैवी, अशी टीका शिवसेनेचे प्रसाद गावडे यांनी केली आहे. कुडाळ मालवण मधील जनतेला ट्रॅफिक जाम आणि उष्माघाताचा त्रास नको या भावनेने निलेश राणेंनी ‘उमेदवारी नामांकन अर्ज भरताना गर्दी जमाव टाळणे’ हे सुज्ञ नेत्याने परिस्थितीचे भान राखून लोकहित जपल्याचे लक्षण आहे, असेही गावडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.सोमवार 28 ऑक्टोबर 2024 रोजी “वसुबारस” सणाने दिपावली सणाचा शुभारंभ झाला. अगदी याच शुभमुहूर्तावार भविष्यातील कुडाळ मालवणचे फिक्स आमदार म्हणून ज्यांच्या नावाचे “भगवे वादळ सिंधुदुर्ग जिल्हातील गावागावात घोंगावते आहे असे महायुतीचे उमेदवार डॉ. निलेश राणे यांनी त्यांचा उमेदवारी नामांकन अर्ज भरताना दाखवलेला समजूतदारपणा अवघ्या कुडाळ- मालवण वासियांनी अनुभवला. ज्यांच्या एका हाकेवर जिल्ह्यातील नव्हेच तर राज्यातील लाखो तरुण धावून येऊ शकतात अशा निलेश राणेंनी त्यांचा उमेदवारी नामांकन अर्ज भरताना केवळ जनतेला “वाहतूक कोंडी व उष्माघाताचा त्रास नको” या भावनेने जमाव रॅली टाळली असे असताना उबाठा मधील काही अल्लड व बिनडोक कार्यकर्ते त्यांच्यावर लपून छपून टीका करत आहेत याची प्रचंड कीव येते.
निलेश राणेंनी राखलेले परिस्थितीचे भान लक्षणीय व कौतुकास्पद
उबाठाचे उमेदवार वैभव नाईकांनी उमेदवारी अर्ज भरताना कुडाळ शहरातून काढलेल्या रॅलीने वाहतूक कोंडी होऊन अनेक शालेय विद्यार्थ्यांना सहामाही परीक्षेच्या पेपरला पोहचण्यास उशिर झाला. ज्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान झालेचं याशिवाय पालकांना मानसिक त्रास देखील झाला. याशिवाय भर उन्हातून काढलेली रॅली व त्यातचं उरकून टाकलेली जाहीर सभा ज्यामुळे अनेक जण चक्कर (भोवळ) येऊन देखील पडले. त्यामुळे निलेश राणेंनी राखलेले परिस्थितीचे भान लक्षणीय व कौतुकास्पद आहे, असे गावडे यांनी म्हटले आहे.
कुडाळ मध्ये वैभव नाईक अपक्ष लढणार?
दहा वर्ष तुम्हा लोकांनी राणे कुटुंबावर चालवलेली कथोकथित दहशतवादाची टेप यापुढे लोकं ऐकणार नाहीत. हे आपल्याला एव्हाना कळून चुकले आहे. म्हणूनच उगाच काहीतरी रंगवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा कुडाळ मालवण सहित एकूण जिल्ह्याच्या विकासात्मक जडणघडणीत मागील दहा वर्षात आमदार नाईकांनी वा उद्धव ठाकरेंनी नेमके कोणते योगदान दिले याचं आत्मपरीक्षण करा. आज निलेश राणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबाबत जे व्हिजन मांडत आहेत. ते जनतेला भावले आहेच, शिवाय त्या गोष्टी घडवण्याची धमक देखील त्यांच्यात आहे. हे कुडाळ मालवणच्या जनतेला पुरेपूर ज्ञात आहे. लोकं आता तुमच्या भावनिक राजकारणाला बळी पडणार नाहीत याची चाहूल लागल्याने अल्लड उबाठा शिवसैनिक सोशल मीडियावर कल्पोकल्पित अफवांचे मेसेज बेनामी व्हायरल करीत आहेत, याची कीव करावीशी वाटते. निलेश राणेंनी समर्थपणे “शिवधनुष्य” हाती घेतल्यानंतर उबाठा मधील काहीं सैर भैर होऊन राणे कुटुंबाबत काहीही बरळत सुटले आहेत. त्यांना एकच प्रेमाचा सल्ला आहे की, उगाच आगीशी खेळण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही मागील दहा वर्षात मतदार संघात काय “दिवे लावलेत ते दिवाळी नंतर 20 तारीखला जनतेच्या दरबारात अनुभवाल, असे प्रसाद गावडे यांनी म्हटले आहे.