मच्छिमारी करत असताना गेला तोल
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा खालची केरवाडी येथील एका मच्छीमाराचा खाडीच्या पाण्यात तोल जाऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हिरोचन लक्ष्मण चोपडेकर (वय ५०, रा. शिरोडा खालची केरवाडी) असे या मृत मच्छीमाराचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा वाजेच्या सुमारास साईबाबा मंदिरासमोरील केरवाडी खाडीपात्रात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, हिरोचन चोपडेकर हे नेहमीप्रमाणे केरवाडी खाडीपात्रात आपल्या पारंपरिक पद्धतीने मच्छिमारी करत होते. या दरम्यान अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाडीच्या खोल पाण्यात कोसळले. पाण्यात बुडाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेबाबत मृत हिरोचन यांचे भाऊ बाळकृष्ण लक्ष्मण चोपडेकर यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात माहिती दिली. दिलेल्या खबरीवरून वेंगुर्ला पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची (CBR) नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रसाद कदम या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.


Subscribe










