कर्नाटकातून गोव्यात नेले जात होते गोमांस
भाजीपाल्याच्या आडून होत होती कर्नाटकातून तस्करी
हिंदुत्ववादी संघटना आणि गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे तस्करी उघड
भाजीपाल्याच्या आडून कर्नाटकातून गोव्यात होणारी गोमांसाची तस्करी हिंदुत्ववादी संघटना आणि गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे उघड झाली. त्यांनी गोमांस घेऊन येणारा ट्रक तिळारी घाटात पकडला आणि पोलिसांना बोलावून घेत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
महाराष्ट्रात गाईला गो मातेचा दर्जा दिला असताना भाजीच्या खोट्या बिलाच्या आधारे पोलिसांच्या आशीर्वादाने म्हापसा व अन्य परिसरात गोमांस नेले जाते असा आरोप स्थानिकांनी केला.
निवडणुकीमुळे कोदाळी येथे स्थिर सर्वेक्षण पथकाचा नाका सुरु करण्यात आला आहे. त्या नाक्यावरून हा ट्रक तपासणी न करता पाठवण्यात आला होता. घाटातील जयकर पॉईंटच्या अलीकडे घाटरस्ता कोसळला आहे, तिथेच जरा अलीकडे हा ट्रक सकाळीच बंद पडला होता. घाटरस्ता कोसळल्याने अवजड वाहनांना जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. त्यामुळे एसटी वाहतूक बंद झाली आहे. मात्र अवजड मालवाहक गाड्या बंदी आदेश झुगारून सुरु असल्याने एसटी सुरु करावी यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोडामार्ग व चंदगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण तर नंतर कोदाळी येथे रास्ता रोको केला होता. त्याने एसटी सुरु झाली नाही मात्र अवजड वाहने बेकायदेशीररित्या सुरु होती. असाच एक ट्रक घाटात बंद पडल्याचे कळताच स्थानिकानी घाटात धाव घेतली.यावेळी दुर्गंधी आल्याने त्यांना संशय आला व त्यांनी पाहणी केली असता खाली बर्फ टाकून त्यावर गोमांस व त्याच्यावर भाजीपाला, भोपळा वैगरे ठेवल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. दरम्यान,तो ट्रक नेण्यासाठी क्रेन घेऊन आलेल्यांना बऱ्यापैकी चोप देण्यात आला.तसेच संतप्त जमावाने ट्रकच्या काचाही फोडल्या.गोमांस पकडल्याचे कळताच गोव्यातून वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गोरक्षक जमा झाले . सर्वांनी गोमांसाची तस्करी करणारे आणि चेक पोस्टवरून ट्रक सोडणाऱ्या पोलिस व अन्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.सुरवातीला पोलिस अधिकारी कारवाई व पंचनामा करण्यास टाळाटाळ करत होते.कार्यकर्त्यांचा रुद्रावतार पाहून त्यांनी कारवाई सुरु केली. चंदगड पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी उपस्थितांना कारवाईचे आश्वासन दिले.