महापुरुष तरुण मित्र मंडळ, आईनमळा यांच्या वतीने आयोजित वारकरी दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न.

कुडाळ : महापुरुष तरुण मित्र मंडळ, आईनमळा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री देव वेतोबा मंदिर ते आईनमळा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर असा वारकरी दिंडी सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात आणि हरिनामाच्या मंगलमय वातावरणात दिंडीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यावर्षीच्या दिंडी सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे अंगणवाडीतील चिमुकल्या बालकांचा उत्स्फूर्त सहभाग होय. वारकरी वेशभूषेत सहभागी झालेल्या बालकांनी भक्ती, संस्कार आणि परंपरेचा सुंदर संदेश दिला.

गावातील ग्रामस्थ, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिंडीचे दर्शन घेतले व हरिनामाचा आनंद लुटला. संपूर्ण गावात भक्ती, एकात्मता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

वारकरी परंपरा जपणे, नव्या पिढीमध्ये संस्कार रुजविणे आणि सामाजिक ऐक्य दृढ करणे हा या दिंडी सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे.
वारकरी दिंडी ही केवळ धार्मिक परंपरा नसून आपल्या गावाची संस्कृती, भक्ती, एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. आपल्या पूर्वजांनी जपलेली ही समृद्ध परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येक ग्रामस्थ आणि तरुणांची आहे.

गावातील सर्व युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच चिमुकल्या बालकांनी अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करावे. आपल्या सहभागातूनच वारकरी परंपरेचा वारसा अधिक समृद्ध होईल आणि पुढील पिढीला भक्ती, संस्कार व सामाजिक एकतेची प्रेरणा मिळेल.
“परंपरा जपूया… संस्कृती वाढवूया… वारकरी संप्रदायाचा पवित्र वारसा पुढील पिढीकडे अभिमानाने सुपूर्द करूया.”

error: Content is protected !!