सावंतवाडी तालुक्यातील घटना
गोवा येथील खाजगी कंपनीत होता कामाला
सावंतवाडी : गोवा येथील खाजगी कंपनीत कामाला असलेल्या २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कारिवडे येथे उघडकीस आली आहे. प्रवीण चंद्रकांत खडपकर (वय २३, रा. कारिवडे, कुंभारवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण हा गोवा येथील एका खाजगी कंपनीत नोकरीला होता आणि रोज घरूनच ये-जा करत असे. मंगळवार २१ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ८:३० वाजता त्याचे आई-वडील आपापल्या कामासाठी घराबाहेर पडले होते. प्रवीणची दुपारी २ वाजता कामाची पाळी असल्याने तो घरीच होता.
दरम्यान, दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्याची आई घरी परतली असता, प्रवीणने घरातील बेडरूममध्ये लोखंडी वाश्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी त्याला खाली उतरवून वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मुळीक, हवालदार शिंदे व सुरेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. प्रवीणच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार दीपक शिंदे करीत आहेत.


Subscribe










