मराठा समाज हॉलमध्ये २७ जून रोजी भव्य सोहळा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाची प्रचिती देणारा, ३५२ वर्षांपूर्वीचा शिवराज्याभिषेक सोहळा पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. इतिहास संकलन समिती कोकण प्रांत आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने, येत्या २७ जून, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी रोजी कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये एका भव्य-दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे ३५२ वर्षांपूर्वी रायगडावर झालेला शिवराज्याभिषेक सोहळा जसाच्या तसा या कार्यक्रमात उभा केला जाणार आहे. त्या काळातील प्रमुख सरदार आणि उमरावांच्या उपस्थितीचे हुबेहूब सादरीकरण येथे पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, ज्यांनी रायगडावर पहिल्यांदा तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात केली, ते इतिहास संकलन समिती कोकण प्रांताचे उपाध्यक्ष सन्माननीय रवीराज पराडकर स्वतः उपस्थित राहून उपस्थितांना त्या ऐतिहासिक गाथेची रंजक माहिती देणार आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष म्हणून हेमंत मुजुमदार जबाबदारी सांभाळणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेशजी राणे आणि स्थानिक आमदार श्री. निलेशजी राणे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि प्रत्येक शिवप्रेमीला अभिमानाचा अनुभव देणारा ठरणार आहे. तरी, तमाम शिवप्रेमींनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शनिवार, दिनांक २७ जून रोजी सायंकाळी ५:३० वाजता मराठा समाज हॉल, कुडाळ येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


Subscribe










