भजनकलेची ज्योत हृदयात अविरतपणे तेवत ठेवणारा ‘अवलिया’ – प्रसाद राणे

कोकण… कोकण म्हणजे कलेचा अथांग सागरच जणू… आपल्या कोकणात दशावतार, जाखडी, नमन अशा अनेक कला प्रसिद्ध आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या कला जिवंत ठेवण्यासाठी कलाकारांनी आपले आयुष्य वेचले आहे. आपण आज एका अशा कलाकाराच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकणार आहोत जो दुर्दैवाने स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. परंतु, त्याच्या कंठातून निघणारे व बोटांमधून उमटणार नादमधुर स्वर ऐकून अनेकांच्या माना डोलावू लागतात. या कलाकाराचे नाव आहे प्रसाद उर्फ बाळा राणे.

प्रसाद राणे यांचा जन्म वेताळ बांबर्डे गावातील एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताची असल्याने आई – वडीलांना उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरीची कामे करावी लागत. प्रसाद यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वेताळ बांबर्डे कदमवाडी येथे झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण शिवाजी विद्यालय हीर्लोक याठिकाणे झाले. यावेळी ते नेहमी सायकलचे प्रवास करत असत. पुढे दहावीच्या परीक्षेत ५० % गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यानंतर कुटुंबाला हातभार ते कुडाळ येथे आले. कुडाळमधील सर्व कामे आटोपून घरी जाण्यासाठी एस. टी. स्टँडवर आले असता नियतीने आपला क्रूर डाव साधला. प्रसाद यांच्या डोळ्यांसमोर अचानक अंधार पसरला आणि त्यांना समोरचे काहीच दिसेनासे झाले. आपल्या भावासोबत त्याच स्थितीत ते घरी आले. डॉक्टरांकडून याबाबत वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतर डोळ्यांच्या नसा कमजोर झाल्याने त्यांना कायमचे अंधत्व आल्याचे त्यांना काळे. प्रसाद यांच्या कुटुंबियांवर जणू आभाळच कोसळले. नशिबाने त्यांच्यासोबत क्रूर चेष्टा केली होती. त्यांच्या आयुष्यातला प्रकाश कायमचा हिरावून घेतला होता.

प्रसाद यांच्या हसत्या खेळत्या आयुष्याला कोणाची तरी ‘दृष्ट’ लागली आणि त्याची ‘दृष्टी’ कायमची गेली. त्यांच्या आयुष्यात निराशेचा अंधार पसरला होता. अशातच ज्या भजनी कलेची त्यांनी लहानपणापासूनच मनोभावे पूजा केली होती तीच भजनी कला त्यांच्यासाठी आधार बनली. निराशेच्या अंधारात आशेचा एक नवा किरण घेऊन आली. याच भजनी कलेचे बोट अलगद पकडून निराशेच्या अंधारातून आशेच्या नव्या प्रकाशाच्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू केली. वडील स्वतः पेटी व तबलावादक असल्याने त्यांना घरातूनच संगीताचे धडे मिळाले. एके दिवशी वडिलांसोबत भजनाला गेले असता सर्वांनी त्यांना भजन म्हणण्याचा आग्रह केला. यावेळी सर्वांच्या आग्रहास्तव त्यांनी स्पर्शज्ञानाने हार्मोनियम वाजवून भजन केली. यावेळी उपस्थित सर्वांनीच त्यांच्या कर्णमधुर स्वरांचे मुक्तकंठाने कौतुक केले. या प्रसंगामुळे प्रसाद यांच्या हृदयाच्या क्षितिजावर एक उमेद घेऊन येणारा सूर्योदय झाला.

सुरुवातीच्या काळात प्रसाद यांचे वडील आणि भाऊ त्यांचे डोळे बनले. त्यांचे वडील त्यांना भजन गाऊन दाखवत असत. तर भाऊ तबलावादक असल्यामुळे भावाने देखील त्यांना चांगली साथ दिली. शिवाय मावशी, मामा, काका आणि मित्रमंडळींची देखील त्यांना चांगली साथ लाभली. परिस्थिती गरिबीची असल्याने भजनामध्ये वाजवली जाणारी वाद्ये त्यांच्याकडे नव्हती. यावेळी वेताळ बांबर्डे उपसरपंच शैलेश घाटकर त्यांच्या मदतीला धावून आले. ग्रामपंचायतीच्या फंडातून त्यांनी प्रसाद यांना भजनी वाद्ये घेऊन दिली. त्या दिवसापासून प्रसाद यांच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली. आज गणेश चतुर्थीच्या काळात त्यांना कुडाळ, मालवण, देवगड या गावातून भजनासाठी बोलावतात. उदबत्तीच्या सुगंधाप्रमाणे दरवळणारी त्यांची ख्याती ऐकून आज अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे हार्मोनियम शिकण्यासाठी येतात. प्रसाद देखील मुक्तहस्ताने त्यांना आपली विद्या देतात. कारण कलेचा वारसा पुढे चालवायचा असेल तर आपल्याजवळील कला दुसऱ्याला देणे आवश्यक असल्याचे त्यांचे स्पष्ट मत आहे.

भजन म्हणजे काय याचे उत्तर सांगताना ते म्हणाले की, भ म्हणजे भाजावे, ज म्हणजे जपावे, न म्हणजे नमावे अर्थात भक्तिरसातून जनमाणसांसमोर नतमस्तक होणे. कला ही जीवनाची सावली असून या भजनकलेमुळे आयुष्यातील निराशेची जागा उत्साह व समाधानाने घेतली. याच कलेने जगण्याचा नवा मार्ग, प्रोत्साहन आणि सन्मानाची भाकरी मिळवून दिल्याचे ते नेहमी सांगतात. आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी न डगमगता त्यांना धैर्याने तोंड द्यावे असे संदेश त्यांनी तरुणाईला दिला आहे.

कोकणी तरुणांनी भजनकलेचा वारसा जपला पाहिजे – प्रसाद राणे

सध्या मोबाईल आणि इंटरनेटच्या काळात तरुणाईने भजन कलेकडे पाठ फिरवली आहे. काहीजण भजनाला येतात परंतु त्यांचा लक्ष नेहमी मोबाईलमध्ये असतो. तरुणांनी असे न करता भजनकलेकडे आपली संस्कृती म्हणून पाहिले पाहिजे. तरच या भजनकलेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू शकेल.

error: Content is protected !!