कणकवली : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात करण्यासाठी ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ या कार्यक्रमाचे भव्य आयोजन कनेडी प्रशालेत करण्यात आले होते. यावर्षी महाराष्ट्रातील शाळा दिनांक १५ जून २०२६ रोजी सुरू होत आहेत.
शालेय शिक्षणाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत आनंददायी वातावरणात केल्यास त्यांचा उत्साह द्विगुणित होईल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची एक सकारात्मक सुरुवात होईल, हा या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश होता.
या विशेष कार्यक्रमासाठी कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सन्मा.श्री. व्ही.बी.सावंत, शालेय समिती चेअरमन श्री.आर.एच. सावंत, श्री.गणपत सावंत, सदस्य श्री.चंद्रशेखर वाळके, श्री. नितीन सावंत,श्री. संतोष सावंत,श्री.अशोक कांबळे, श्री. आरमन घोन्सालवीस आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी नवोगत विद्यार्थ्यांचे व पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना व्ही.बी. सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विविध स्पर्धा परीक्षा,डिजिटल क्लासरूम अशा सुविधांसाठी संस्था नेहमीच कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. तर आर.एच.सावंत यांनी कनेडी प्रशाळेतील प्रवेश म्हणजे विद्यार्थ्यांच्या चांगल्या प्रगतीची वाटचाल,मुबलक पायाभूत सुविधा,कौशल्य आधारित व गुणवत्तापूर्ण शिक्षण,कला, क्रीडा, नृत्य क्षेत्रात करिअर करण्याची नवीन संधी भविष्यात विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील.या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि विकसित महाराष्ट्र २०४७ च्या प्रभावी अंमलबजावणीला गती मिळणार आहे.
सदर कार्यक्रमांसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच नवोगत विद्यार्थी, प्रशालेचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक
मुख्याध्यापक श्री.सुमंत दळवी, उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार श्री.प्रसाद मसुरकर सर यांनी केले.


Subscribe










