धोकादायक व्यापारी मार्केटच्या पुनर्बांधणीसाठी व्यापाऱ्यांचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांना निवेदन

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर आणि शिष्टमंडळाने व्यापारी संकुल उभारणीबाबत नगराध्यक्षांशी केली चर्चा

कणकवली : अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतीच्या मालकीच्या जागेतील व्यापारी वर्गाने सोमवारी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेतली. यावेळी व्यापाऱ्यांच्या विविध समस्या तसेच नव्या व्यापारी संकुल उभारणीबाबत सुमारे दोन तास सविस्तर चर्चा करण्यात आली.

या चर्चेत अनिल मेस्त्री, राजू म्हापसेकर, महेश मेस्त्री, सचिन कुवळेकर, जमिलभाई कुरेशी, प्रभाकर कदम ,ऋणाली पेडणेकर, भगवान कासले, राम सुर्यवंशी, महेश वायगंणकर, प्रभाकर कदम, प्रसाद पाताडे, अविनाश गावडे, बाबुराव घाडीगावकर, जाधव, नुरूभाई, निखार्गे , महाडिक, भारती फाटक, आदी बहुसंख्येने व्यापारी बांधव यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रस्तावित व्यापारी संकुल उभारणीसंदर्भात व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करताना सर्व संबंधित घटकांचा विचार केला जाईल, तसेच नव्या व्यापारी संकुलामध्ये विद्यमान व्यापाऱ्यांना समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

यावेळी उपस्थित व्यापाऱ्यांनी नगराध्यक्षांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायत मालकीचे व्यापारी मार्केट (पूर्वीचे भाजी मार्केट) येथील स्लॅबची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून ती कोसळण्याच्या मार्गावर आहे. पहिल्या मजल्यावरील काही भिंती कोसळल्या असून इमारतीचा एक भाग देखील पडला आहे. त्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सदर मार्केटमध्ये तळमजल्यावरील १३ गाळे, पहिल्या मजल्यावरील ३ गाळे तसेच १ पत्राशेड मिळून एकूण १७ गाळेधारक असून, याशिवाय ३६ खोकेधारकांची नगरपंचायतीमध्ये अधिकृत नोंद आहे. हे सर्व व्यापारी नियमितपणे भाडे भरत आहेत. तसेच महसूल विभागाच्या जागेवरील ११ खोकेधारक आणि गेली १० ते १५ वर्षे भाडेतत्त्वावर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचाही विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांनी नगराध्यक्षांना प्रत्यक्ष पाहणी करून या जागेवर लवकरात लवकर आधुनिक व्यापारी संकुल उभारण्याची आणि सर्व विद्यमान व्यापाऱ्यांना त्यामध्ये समाविष्ट करण्याची विनंती केली आहे.

बैठकीनंतर सामाजिक कार्यकर्ते तथा गाळेधारक राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि उपस्थित व्यापारी बांधवांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे आभार मानून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सांगितले की, व्यापाऱ्यांच्या प्रश्नांबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचीही भेट घेऊन या विषयाची माहिती देण्यात आली होती. येत्या काही दिवसांत सर्व व्यापारी बांधवांच्या उपस्थितीत पालकमंत्री नितेश राणे यांची पुन्हा भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या विषयासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांनाही निवेदन सादर करण्यात आले.

error: Content is protected !!