हिंदुत्ववादी विचारसरणीला बळ मिळाल्याचा दावा – पालकमंत्री नितेश राणे
कणकवली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विविध कामगिरीचा आढावा पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत मांडला. मोदी सरकारचा इतिहास हा हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारा असून, राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारही त्याच विचारांशी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
ते सोमवारी कणकवली येथील प्रहारभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की,
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कालावधीत विविध क्षेत्रांत परिवर्तन घडल्याचा दावा करताना त्यांनी विशेषतः अयोध्येतील राम मंदिर उभारणी तसेच कलम ३७० हटविण्याचा उल्लेख केला. तसेच लव्ह जिहादसारख्या विषयांवर हिंदुत्ववादी सरकारने वेळोवेळी कठोर भूमिका घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.
“२०१४ पूर्वीचा भारत हा तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे ओळखला जात होता. त्या काळात ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ असे बोलण्यासही भीती वाटत होती. मात्र, आज ‘जय श्रीराम’चा उद्घोष अभिमानाने केला जातो. हा बदल २०१४ नंतरच्या हिंदुत्ववादी सरकारमुळे घडला आहे,” असे नितेश राणे म्हणाले.
हिंदू समाजातील असुरक्षिततेची भावना दूर झाली असून ‘राष्ट्र प्रथम’ या विचारातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक कार्यकर्ता म्हणून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि देशात आमूलाग्र बदल घडून आले, असेही त्यांनी सांगितले. “जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा” या भूमिकेवर हिंदुत्ववादी सरकारची स्थापना झाली असून, ही बाब हिंदू समाजाने लक्षात ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मोदी@१२ अभियानाचे जिल्हा संयोजक रणजित देसाई, सिंधुदुर्ग भाजप जिल्हा सरचिटणीस,संदीप साटम, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा अध्यक्ष निसार शेख, कणकवली मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, ओरोस मंडल अध्यक्ष भाई सावंत, कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, बांदा अध्यक्ष मधु देसाई, सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण परब, सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यालय प्रमुख समर्थ राणे आदी उपस्थित होते.


Subscribe










