त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी
शिवसेना उबाठाचे कार्यकर्ते स्वप्नील संतोष रावराणे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
कोळपे जि. प. गटाचे जि. प. सदस्य प्रमोद रावराणे यांनी निवडणूक शपथपत्रात स्वतःच्या व पत्नीच्या नावावरील स्थावर मालमत्तेबाबत अपूर्ण व चुकीची माहिती दिली आहे. याबाबत चौकशी करून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी शिवसेना उबाठाचे कार्यकर्ते स्वप्नील संतोष रावराणे (रा. सांगुळवाडी) यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
याबाबत प्रसिद्धिस दिलेल्या तक्रारीत स्वप्निल रावराणे यांनी म्हटले आहे, सन २०२६च्या जि प निवडणुकीत प्रमोद रावराणे यांनी सादर केलेल्या नामनिर्देशन व शपथपत्रांमध्ये स्वतःच्या व पत्नीच्या नावावरील सर्व स्थावर मालमत्तेचा संपूर्ण खुलासा केलेला नाही. काही गावातील गट क्रमांकातील मालमत्ताचा शपथपत्रात उल्लेख नसल्याचा तसेच शपथपत्रातील माहिती व प्रत्यक्ष अधिकृत नोंदणी यांच्यात विसंगती असल्याचा आरोप केला आहे. आपण ही तक्रार अधिकृत महसूल अभिलेख, माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रे आणि निवडणूक अभिलेखाच्या आधारे केलेली आहे.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि मतदारांना खरी माहिती मिळावी या उद्देशाने ही तक्रार केली असल्याचे श्री. रावराणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रमोद रावराण यांच्यावर भारतीय न्याय संहिता व भारतीय सुरक्षा संहिता तसेच निवडणूक कायद्यातील दंडात्मक तरतुदीनुसार गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
रावराणे यांच्याविरुद्ध तक्रार केल्यामुळे माझ्या जीवितास धोका – स्वप्नील रावराणे
जि. प. सदस्य प्रमोद रावराणे यांच्याविरुद्ध तक्रार केल्यामुळे आपल्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तरी आपल्याला पोलिस संरक्षण देण्यात यावी, तसेच या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करावी, अशी मागणी आपण जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.


Subscribe










