निलेश राणे यांच्या घटलेल्या मताधिक्क्यात अंतर्गत ‘बटेंगे तो कटेंगे’ फॅक्टर ?

वैभव नाईकांच्या पराभवात ‘सेफ है’ पॅटर्न नडला ?

पदाधिकारींच्या धुसफुशीने संशयाचे बाण एकमेकांकडे !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघातल्या विधानसभा निकालानंतर तब्बल आठवड्यानंतरच्या दोन घटनांनी पुन्हा एकदा मालवण कुडाळचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाच्या दोन संवाद बैठकात उपस्थित झालेल्या प्रश्नांनी घटलेल्या मताधिक्यामागे नेमकं कोण हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

आमदार निलेश राणे यांचा दैदीप्यमान विजय हा राणे कुटुंबाचा आणि मतदारांचा असून त्याबद्दल आभार मानण्यासाठी मालवण भाजपाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत अनेक खळबळजनक मुद्द्दयांवर थेट तोफ डागण्यात आली आहे. वैभव नाईक यांना मिळालेली मते ही त्यांच्या पक्षांची किंवा कार्यकर्त्यांची नसून त्यांना मसल पॉवर देणारे कोण आहेत याचा शोध घ्यायलाच हवा. लोकसभा, विधानसभा निकालात आम्ही स्पष्टपणे सत्तर टक्के एवढ्या ताकदीने होतो, तरीपण घटलेल्या मताधिक्क्याने आता निलेश राणे यांचा पोलिटिकल एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न होता का असा थेट आरोप करत भाजपचे मालवण तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर यांनी करत राजकीय वादळ निर्माण केले आहे. आमदार निलेश राणे यांच्या विजयात खासदार नारायण राणे आणि माननीय रविंद्र चव्हाण यांचाच विजयाचा वाटा मोठा आहे असे नम्रपणे नमूद करत भाजपमधील घरभेद्यांवर तोफ डागत अंतर्गत धुसफूशीला वाट मोकळी करुन दिली आहे.

तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात माजी आमदार वैभव नाईक यांनी जनतेचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली . त्याचवेळी शिवसेना उबाठाचे नितीन वाळके यांनी पक्षात अंतर्गत आलबेल नसल्याची जाणीव करुन दिली आहे. निवडणुकीच्या पुर्वी एक आठवडा प्रचाराऐवजी गाफील राहणाऱ्या कार्यकर्त्यांचा मताधिक्यात फटका पडला असा आरोप करतांना महिला पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत गटबाजीचा मुद्दा नितीन वाळके यांनी अधोरेखित केला आहे. वाळके यांनी हा मुद्दा मांडताच त्यांना भर सभेत हा विषय वगळा असे सांगितल्यामुळे अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

लोकसभा विधानसभा निकालानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रमुख विरोधी पक्षांकडून विरोधकांऐवजी स्वकियांवर डागलेल्या तोफांमुळे आता कोणता नवा धमाका होणार याकडे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!