दहावीच्या परीक्षेत धक्कादायक प्रकार

शिक्षकानेच लिहिली विद्यार्थ्याची पुरवणी;

विद्यार्थ्याचा निकाल रोखला

सिंधुदुर्गनगरी : मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. एका केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्याची पुरवणी चक्क एका शिक्षकानेच लिहून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पेपर तपासणी दरम्यान मूळ उत्तरपत्रिका आणि पुरवणी यांमधील हस्ताक्षरात मोठी तफावत असल्याचे एका सतर्क परीक्षकाच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने या गंभीर प्रकाराची तक्रार कोकण विभागीय शिक्षण मंडळाकडे केली. बोर्डाने केलेल्या प्राथमिक चौकशीत या आरोपांमध्ये तथ्य आढळल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कोकण बोर्डाने सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाला सखोल चौकशीचे आदेश दिले होते. उपशिक्षणाधिकारी संजय माने यांच्याकडे या चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली असून, संबंधित परीक्षा केंद्र, पर्यवेक्षक आणि संशयित शिक्षकांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्य म्हणजे, परीक्षा संपल्यानंतर पेपर बोर्डाकडे जमा होत असताना शिक्षकाने ही पुरवणी कधी आणि कशी लिहिली, यात परीक्षा केंद्रावरील इतर यंत्रणेची फूस होती का, असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. निकालाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि शाळेचा खोटा लौकिक टिकवण्यासाठी थेट शिक्षकानेच असे कृत्य केल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गुणवत्तेत नेहमीच अव्वल राहणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकण बोर्डाच्या नावाला या प्रकारामुळे काळा डाग लागला आहे. प्राथमिक चौकशीत गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर कोकण बोर्डाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी संबंधित विद्यार्थ्याचा निकाल सध्या राखून (थांबवून) ठेवला असल्याचे स्पष्ट केले आहे. या गैरकृत्यात सहभागी असलेला शिक्षक परजिल्ह्यातील असून केवळ पैशाच्या आमिषापोटी त्याने हा प्रकार केल्याची चर्चा आहे. दरम्यान, ‘कॉपीमुक्त अभियान’ राबवले जात असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे, केवळ कागदोपत्री चौकशी न करता दोषींवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

error: Content is protected !!