झाडांना आईप्रमाणेच प्रेम द्या – सयाजी शिंदे
विविध प्रजातीच्या बिजांचे संकलन करण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांचा सिंधुदुर्ग दौरा
निवती : झाडे आणि आईपेक्षा कोणीही मोठे नसून आई आपल्याला जन्म देते तर झाडे आपल्याला श्वास देतात. म्हणूनच झाडांना आईप्रमाणे प्रेम द्या असे प्रतिपादन सिने अभिनेता सयाजी शिंदे यांनी केले. कोकणातील विविध प्रजातीच्या बियांचे संकलन करण्यासाठी ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या शुभकार्याची सुरवात त्यांनी निवती येथील निसर्गरम्य देवराई श्री. देव डुंगोबाचे दर्शन घेऊन केली. यावेळी ते म्हणाले की, निसर्ग हाच डुंगोबा असून या ठिकाणी आल्यानंतर जगण्यासाठी आवश्यक असणारी प्राणशक्ती मिळते. पुढे ते म्हणाले की, डुंगोबाची वनराई हे जगातील सर्वात मोठे आश्चर्य असून येथे आढळणारी जैवविविधता जगात कोठेच आढळत नाही. तसेच माणसाने कितीही लुटण्याचा प्रयत्न केला तरीही येथील जैवविविधता कधीही संपणार नाही असेही ते म्हणाले.
निसर्गाच्या जैवविविधतेला पोखरणाचे काम माणसांकडून सुरू असून इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतः काहीतरी सुरुवात करावी यासाठी बीज संकलनाचा (सीड कलेक्शन) उपक्रम हाती घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. “तुम्ही (झाडे) तोडून दाखवा, आम्ही पुन्हा लावून दाखवतो” असे आव्हानच त्यांनी जणू मनुष्य प्रजातीला दिले.
माणूस पैशाने कितीही श्रीमंत असला तरीही तो आपल्याकडे असणारे पैसे किंवा संपत्ती खाऊन जगू शकत नाही. यासाठी आवश्यक असणारे अन्न, श्वास, सावली आपल्याला झाडांकडून मिळते. एकंदरीत आई आपल्याला जन्म देते तर झाडे आपल्याला जगवतात. म्हणूनच झाडे आणि आईपेक्षा कोणीही मोठे नाही असे ते यावेळी म्हणाले. ज्याप्रमाणे माणसांकडे पहिले जाते त्याच दृष्टीने झाडांकडे पहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. एखादा माणूस आजारी पडल्यावर ज्याप्रमाणे रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) धावून येते त्याचप्रमाणे एखाद्या झाडाची फांदी जरी तुटून पडली तरी सर्वांनी त्या ठिकाणी धावून गेले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे सीड कलेक्शनबाबत (बीज संकलन) बोलताना ते म्हणाले की, कोकणात उन्हाळ्याच्या दिवसात विविध फळे उगवतात. या फळांच्या बीजांचे संकलन करून त्या बिया काही नर्सरींना दिल्या जातात. या नर्सरीमध्ये पुढे सर्व बियांचे शास्त्रोक्त पद्धतीने बीजारोपण केले जाते. ज्याप्रमाणे एखाद्या स्त्रीचे बाळंतपण केले जाते त्याचप्रमाणे या बीजांची प्रसुती या नर्सरीमध्ये केली जाते. ही नर्सरी म्हणजे जणू झाडांचे प्रसुतीगृहच असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी “बी एके बी, बी दुणे शंभर, पहिला माझा नंबर” या स्वतः लिहिलेल्या कवितेचे उदाहरण त्यांनी यावेळी दिले. एका बीजामध्ये शेकडो बिया तयार करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
झाडे ही स्वतःहून निसर्गात उगवतात. आपल्याला फळे, फुले व ऑक्सिजन देतात. स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. म्हणूनच झाडे ही स्वयंभू असून त्यांना देवाचा दर्जा दिला पाहिजे असे ते यावेळी म्हणाले. कोकणातील देवराया ही कोकणची ओळख असून आपण त्यांची काळजी घेतली तर पुढे याच देवराया आपली काळजी घेतील असं ते म्हणाले. तसेच देवरायांचे संगोपन करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
शिरवाळे आणि रस यांचा घेतला आस्वाद
यावेळी कोकणातील प्रसिद्ध स्वीट डिश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस आणि शिरवाळे (शेवया) यांचा त्यांनी आस्वाद घेतला. हॉटेलमध्ये जाऊन पिझ्झा आणि बर्गर खाण्यापेक्षा रुचकर आणि पौष्टिक अशा शिरवाळ्यांचा समावेश आहारात करावा असे आवाहन त्यांनी तरुणाईला केले.


Subscribe










