भक्तिरसात रंगली केळूस- कालवीबंदर येथील श्री विठ्ठल-रखुमाई महिला मंडळाची फुगडी

आरोंदा-सिपेतुवाडीतील श्री देव ब्राम्हण मंदिराचा संप्रोक्षण विधान व कलशारोहण सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी : आरोंदा – सिपेतुवाडी येथील श्री देव ब्राम्हण मंदिराचा संप्रोक्षण विधान व कलशारोहण सोहळा (सोमवार दि.११ मे त मंगळवार दि.१२ मे रोजी) अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.गावातील ग्रामस्थ,भाविक आणि महिला मंडळांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता.विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.तर मंदिर परिसर आकर्षक सजावटीने उजळून निघाला होता, तसेच मंत्रोच्चार, ढोल-ताशांचा निनाद आणि धार्मिक विधींमुळे वातावरणात एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली होती.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरला तो केळूस-कालवीबंदर येथील दिव्या खवणेकर हिच्या संकल्पनेतून सादर केलेला श्री विठ्ठल-रखुमाई महिला मंडळाचा फुगडीचा मनमोहक कार्यक्रम. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी सादर केलेल्या या भक्तिमय फुगडीने उपस्थितांची मने जिंकली. “विठ्ठल-विठ्ठल” च्या गजरात सादर झालेल्या या कार्यक्रमाला भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.

पारंपरिक संस्कृती, भक्ती आणि स्त्रीशक्तीचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला. या कार्यक्रमादरम्यान सपना केळुसकर यांचे सुमधुर गायन आणि त्याला ढोलकीवरून साथ देण्याची महत्वपूर्ण जबाबदारी निभावणारे रामदास राऊळ यांनी देखील रसिकांची मने जिंकली.या फुगडीत कु. हिमानी कुबल,सौ. जयश्री राऊळ, सौ. वेदिका खवणेकर, अनुजा राऊळ,जान्हवी पाटील, मानसी पाटील, लावण्या राऊळ, नताशा कुबल, दिव्यांका कोचरेकर,मंजुश्री कुबल,वैष्णवी तेंडोलकर, वैदही बोवलेकर, भक्ती कोचरेकर आदी महिलांनी फुगडीत सहभाग घेतला होता.

कार्यक्रमानंतर सहभागी झालेल्या महिलांचा सन्मान आरोंदा सिपेतुवाडी येथील ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी बाळा कुबल, देवदत्त मेस्त्री, नामदेव तारी, प्रमोद चोडणकर,अमरेश अनंत चोडणकर,नामदेव तारी आणि पांडुरंग तारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. दरम्यान या संपूर्ण सोहळ्यात ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. दरम्यान ही धार्मिक परंपरा जपत गावातील एकोप्याचे दर्शन घडविणारा हा सोहळा भाविकांच्या स्मरणात कायम राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!