१० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, ओरोस येथील कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली (५६) यांना एका तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. वैद्यकीय उपचारांचे बिल मंजूर करण्यासाठी त्यांनी ही लाचेची मागणी केली होती. ४ मे २०२६ रोजी ही कारवाई जिल्हा रुग्णालयातील त्यांच्या राहत्या कक्षातच करण्यात आली, ज्यामुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४९ वर्षीय तक्रारदाराने त्यांच्या वैद्यकीय उपचारांच्या बिलाची फाईल मंजुरीसाठी सादर केली होती. मात्र, या बिलात काही तांत्रिक त्रुटी असल्याचे सांगून तेली यांनी काम करून देण्यासाठी बिलाच्या एकूण रकमेच्या ३ टक्के म्हणजेच १८,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर तडजोडीनंतर ही रक्कम १०,००० रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने या प्रकाराबाबत कुडाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन लेखी तक्रार नोंदवली होती.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ मे रोजी जिल्हा रुग्णालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून १० हजार रुपये स्वीकारताना महादेव तेली यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई ला.प्र.वि. ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील व अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग युनिटचे पोलीस उप-अधीक्षक विजय पांचाळ, पोलीस निरीक्षक दिपक माळी आणि त्यांच्या टीमने यशस्वीरीत्या पार पाडली.


Subscribe










