वेंगुर्ले परबवाडा येथील घटना
वेंगुर्ले : परबवाडा येथील ७९ वर्षीय वृद्ध अरुण गणपत भोवर यांना जमिनीत जाण्याच्या वाटेवरून झालेल्या वादातून दोघांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. ही घटना ९ मे रोजी सकाळी ७:३० च्या सुमारास घडली असून, याप्रकरणी भोवर यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अरुण भोवर हे मूळचे परबवाडा-भोवरवाडा येथील रहिवासी असून, त्यांचा मुलगा मुंबईत राहत असल्याने ते काही काळ मुंबईतही वास्तव्यास असतात.
तक्रारीनुसार, भोवर यांच्या मालकीची गावात २२.०६ गुंठे जमीन असून, तेथे त्यांची वडिलोपार्जित शेती आणि बागायती आहे. त्याच वाडीत राहणारे उमेश बाबुराव परब आणि गोविंद बाबुराव परब यांच्याशी भोवर यांचा गेल्या तीन वर्षांपासून जमिनीच्या वाटेवरून वाद सुरू आहे. यापूर्वीही त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या होत्या. याच वादाचा राग मनात धरून, भोवर बागायतीमधून घरी परतत असताना परब बंधूंनी त्यांना अडवून हातातील लाकडी दांड्याने पाठीवर, हाता-पायांच्या पोटरीवर आणि मांडीवर बेदम मारहाण केली.
मारहाणीच्या या घटनेनंतर अरुण भोवर यांनी कसाबसा स्वतःचा बचाव करत तेथून सुटका करून घेतली. त्यांनी थेट वेंगुर्ले पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. वैद्यकीय अहवालासह त्यांनी उमेश परब आणि गोविंद परब यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, वाटेच्या वादातून वृद्धाला झालेल्या या मारहाणीमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.


Subscribe








