जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती
कुडाळ : विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण या संस्थेच्या कार्यामुळे ठाकर संस्कृती टिकून असून पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची कला जगभरात पोहोचली आहे असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी मा. श्रीम तृप्ती धोडमिसे यांनी काढले. विश्राम ठाकर आदिवासी कला आंगणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील, अनुराधा महेशकुमार नारकर (जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण समिती सभापती), समृद्धी संतोष चव्हाण पंचायत समिती सदस्य देवगड, सुरेश रणसिंग, प्रवीण गंगावणे, दिल्ली येथून विनती भाट (त्यांच्यासोबत चित्रकथी व गंजिफा कलेचा अभ्यास करणाऱ्या महिला), चेतन गंगावणे, भरत ठाकुर अमित गंगावणे,
आदी उपस्थित होते.
विश्राम ठाकर आदिवासी कला आंगणचा २० वा वर्धापन दिन रविवार दिनांक ३ मे २०२६ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत संबळ हे पारंपरिक वाद्य वाजवून करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण यांच्याकडून देण्यात येणारा कै. शरद गरुड स्मृती पुरस्कार चित्रकार अक्षय सावंत सावंतवाडी यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वी जिल्ह्यातील सांस्कृतीक क्षेत्रांचा अभ्यास करण्यासाठी मी या संग्रहालयाला भेट दिली होती. आज माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या असून विश्राम ठाकर आदिवासी कला आंगणच्या माध्यमातून कोकणची लोककला सातासमुद्रापार पोहोचली असल्याचे त्यांनी म्हटले. ठाकर आदिवासी कला आंगणमुळे सागरी पर्यटनाच्या व्यतिरिक्त कोकणी संस्कृतीचा एक वेगळा अनुभव घेता येत असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले.
यानंतर तहसीलदार सचिन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ठाकर आदिवासी कला आंगणने राबवलेल्या स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी मुक्तकंठाने कौतुक केले.
यावेळी पर्यटन, कला, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना कोकणरत्न पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व चित्रकथी आर्ट देऊन सन्मानित करण्यात आले.
यानंतर ठाकर आदिवासी समाजाच्या पोतराज व कळ बाहुली या पारंपरिक लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचा शेवट ओंकार दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग सुवर्णमणी प्राप्ती या नाटकाने झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एकनाथ गंगावणे यांनी केले.


Subscribe










