दोडामार्गात आमदार प्रमोद जठार यांचे जल्लोषात स्वागत

सिंधुदुर्ग दौऱ्याची सुरुवात; भाजपा पदाधिकाऱ्यांकडून जोरदार स्वागत

दोडामार्ग : विधानपरिषद आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार प्रमोद जठार हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता दोडामार्ग तालुक्याला त्यांच्या स्वागताचा पहिला मान मिळाला. भाजपा पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ व हार घालून त्यांचे उत्साहात स्वागत केले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष दीपक गवस, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावक, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सभापती पार्वती गवस, पं. स. सदस्य संजय सातार्डेकर, सोनिया कुबल, दिक्षा महालकर, राजेश फुलारी, देवेंद्र शेटकर, रंगनाथ गवस, प्रवीण गवस, आकांशा शेटकर, अंकुश नाईक, भैया पांगम, संध्या प्रसादी, संजना म्हावळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते होते.

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, प्रमोद जठार यांचे नेतृत्व विधानपरिषदेत पोहोचणे ही काळाची गरज होती. 2008 सालापासून त्यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून भाजप संघटना मजबूत केली. 2009 मध्ये ते आमदार झाले. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी झाल्या, मात्र त्यांनी कधीही हार मानली नाही.

ते पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजप कमळ चिन्हावर विजय मिळवण्यासाठी मोठी मेहनत घेण्यात आली. खा. नारायण राणे यांच्या विजयामागे प्रमोद जठार यांचे योगदान महत्त्वाचे आहे. आगामी काळातही पक्षाचा विजय शतप्रतिशत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

आमदार प्रमोद जठार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पद मिळतं किंवा मिळत नाही, पण कार्यकर्त्यांनी कधीही खचून जायचं नसतं. भाजपचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान बाळगा. ही पार्टी पद किंवा पैशांसाठी नाही. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करा.

ते पुढे म्हणाले, पूर्वी आपण विरोधात असताना आंदोलन, मोर्चे आणि उपोषण करत होतो. आता सत्ता आपली आहे, त्यामुळे विकासावर भर देणे गरजेचे आहे. प्रत्येक योजनेचा लाभ घराघरात पोहोचला पाहिजे. जनतेला सोल्युशन दिलं तर जनता निश्चित आपल्या पाठीशी उभी राहील.

error: Content is protected !!