सावंतवाडीत बनावट नोटांचे रॅकेट उघड

सांगली कनेक्शनमधून सहा जणांना अटक

सावंतवाडी : सावंतवाडी येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेत भरण्यात आलेल्या रक्कमेत २०० रुपयांच्या ८ बनावट नोटा आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. बँकेच्या कॅशिअरने या नोटा ओळखल्यानंतर शाखा व्यवस्थापकांनी तातडीने सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या नोटांच्या सिरीयल नंबरची सखोल तपासणी केली असता, या नोटांची लिंक सांगली येथील बनावट नोटांच्या कारखान्याशी असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, ऑक्टोबर २०२५ मध्ये सांगली पोलिसांनी उद्ध्वस्त केलेल्या कारखान्यातील नोटांच्या सिरीजशी या नोटांचे क्रमांक तंतोतंत जुळले आहेत.

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाची चक्रे फिरवली. या बनावट नोटा प्रकरणी सांगली कारागृहात आधीच शिक्षा भोगत असलेल्या सहा संशयित आरोपींना न्यायालयाच्या आदेशानुसार सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कोल्हापूर येथील सुप्रीत देसाई, राहुल जाधव, इब्रार इनामदार, नरेंद्र शिंदे, संदीप कांबळे आणि मुंबईतील सिद्धेश म्हात्रे यांचा समावेश आहे. या सहाही आरोपींना सावंतवाडी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

बनावट नोटांचे हे रॅकेट केवळ सांगली किंवा कोल्हापूरपुरते मर्यादित नसून त्याची व्याप्ती कोकण आणि गोव्यापर्यंत पसरली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या अटकेमुळे बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड होण्याची चिन्हे आहेत. नागरिकांनी आपल्याकडे अशा प्रकारच्या बनावट नोटा आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले आहे. जसजशा तक्रारी येतील, तसे नवीन गुन्हे दाखल करून या गुन्ह्यातील इतर दुव्यांचा शोध घेतला जाणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

error: Content is protected !!