तळाशील मधील महिलांची खाडीपात्रात उडी

इशारा देऊन कारवाई न केल्याने थेट खाडीपात्रात धरणे आंदोलन

मालवण : अनधिकृत वाळू उत्खनन व कारवाईसाठी गेले पाच दिवस आंदोलनात उतरलेले तळाशिलवासिया पाचव्या दिवशी अधिक आक्रमक बनले. महिलांनी खाडीपात्रात उतरत आपले आंदोलन अधिक तीव्र केले आहे. सांयकाळी महिला थेट खाडीपात्रात उतरल्या आणि घोषणा दिल्या. तळाशिलवासियांनी प्रशासनाच्या भूमीकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. खाडीपात्रातील पाण्यात बुडाल्याने सौ. रजनी मायबा या अत्यवस्थ बनल्याने त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले होते. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त तळाशिल मध्ये तैनात करण्यात आलेला होता. तरीही महिला आक्रमक बनत कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. जोपर्यंत प्रशासनाकडून बेकायदेशीर वाळू उत्खनन व वाहतूक रोखली जात नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमीका तळाशिल ग्रामस्थांनी घेतली आहे.

गेले चार दिवस सनदशिरमार्गाने करण्यात येत असलेल्या आंदोलनातून प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने आज ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मासेमारी हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. तळाशील होडीने आमच्या मत्स्यविक्रेत्या महिला मिळालेले मासे घेऊन मालवण येथे विक्रीसाठी नेतात. मात्र रेवंडी येथील जेटीवर मासे उतरवण्यास व तेथून प्रवास करण्यास अटकाव केला जात आहे. जेटीचा वापर करू नये, असे सांगितले जात आहे.

रेवंडी गावचे सरपंचही अशाच प्रकारची भूमिका घेत आहेत. याचा मोठा परिणाम आमच्या रोजी रोटीचा व्यवसाय असलेल्या मासेमारीला बसत आहे. दुसरीकडे अनधिकृत सुरू असलेल्या वाळू उत्खननामुळे तळाशीलच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. सर्व किनाऱ्याच्या बाजूने माती खचत असून माड बागायती तसेच अनेक घरांनाही धोका निर्माण होत आहे. हे सर्व होत असताना काहीजण अनधिकृत वाळू व्यावसायिकांची बाजू घेत असल्याचे समोर आले आहे. यालाही आमचा विरोध असून अशा प्रवृत्तींना आमचा ठाम विरोध आहे. प्रशासनाने अनधिकृत वाळू उपसा तसेच अनधिकृत वाळू उपशाच्या ज्या बोटीची आम्ही माहिती दिली त्यावर कारवाई करावी, अशी भूमिका ग्रामस्थांच्या वतीने ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळुसकर यांनी आज पुन्हा मांडली.

error: Content is protected !!