नानेली-माणगाव जोडणाऱ्या कालिकामंदिर येथील पुलाखाली मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने पावसाळ्यात ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पुलाखाली मोठमोठी लाकडांची ओंडके, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या तसेच इतर कचरा अडकून पडल्यामुळे पुलाच्या सात पैकी केवळ दोनच पाईपमधून पाण्याचा निचरा होत होता.
नानेली गावातील नागरिकांसाठी हा मार्ग ये-जा करण्याचा एकमेव दुवा असल्याने ही समस्या गंभीर बनली होती. मुसळधार पाऊस पडला की पाण्याचा प्रवाह अडल्याने पुलावरून पाणी वाहू लागायचे आणि ग्रामस्थांचा संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण होत होती.
नानेली ग्रामपंचायत सदस्य श्री. विनय कदम यांनी ही बाब शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पंचायत समिती कुडाळ गटनेते श्री. योगेश धुरी यांच्या निदर्शनास आणून दिली. समस्येची गांभीर्याने दखल घेत श्री. धुरी यांनी तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने पुलाखाली अडकलेला कचरा हटविण्याची कार्यवाही केली.
या साफसफाईमुळे पुलाचे सातही पाईप पूर्णपणे मोकळे झाले असून पाण्याचा निचरा सुरळीत होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे आता मुसळधार पावसाच्या वेळी पुलावरून पाणी वाहण्याचा धोका कमी होणार असून ग्रामस्थांनी या तातडीच्या कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.



Subscribe










