सावंतवाडी पोलिसांची रत्नागिरीत धडक कारवाई
सावंतवाडी: मुंबईहून आईसोबत गावी राहण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबई येथील साई बसेश्वर शिंगे (१८) आणि रोनक मोहन राठोड (१८) या दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यासोबत असणारी तिसरी मुलगी ही अल्पवयीन मैत्रीण आहे. हे तिघेही मुंबईचे रहिवासी असून ही घटना सोमवारी सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी आईसोबत गावी आली होती. दरम्यान, मुंबईतील तिचे शेजारी राहणारे मित्र-मैत्रीण गोवा फिरण्यासाठी आले असता त्यांनी या मुलीलाही सोबत नेले. मात्र, मुलीच्या आईला हे पसंत नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तत्परतेने शोध घेत सावंतवाडी रेल्वे स्थानक परिसरातून त्या मुलीला तिच्या मित्रांसह ताब्यात घेतले आणि मुलीला आईच्या स्वाधीन केले.
मात्र, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आईचा विरोध असतानाही ही अल्पवयीन मुलगी पुन्हा आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत मुंबईला जाण्यासाठी निघाली. पोलिसांनी तातडीने रेल्वे पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवली आणि मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेच्या एका डब्यातून या मुलीसह तिच्या मित्रांना रत्नागिरी येथे ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सावंतवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.


Subscribe









