ओवळिये डंपर अपघातातील गंभीर जखमी युवकाचा मृत्यू

बांदिवडे गावावर शोककळा

डंपरची दुचाकीला बसली होती जोरदार धडक

मालवण : हिवाळे-कसाल मुख्य मार्गावरील ओवळिये रामेश्वर मंदिरानजीक झालेल्या भीषण डंपर-दुचाकी अपघातातील गंभीर जखमी युवक मयुरेश मंगेश राणे (२३, रा. बांदिवडे पालीयेवाडी) याचे रविवारी गोव्यात उपचार सुरू असताना दुर्दैवी निधन झाले. गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या या अपघातात मयुरेशला गंभीर दुखापत झाली होती, त्यानंतर चार दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली, मात्र अखेर ही झुंज अपयशी ठरली. मयुरेश हा कुडाळ येथील एका नामांकित बजाज दुचाकी शोरूममध्ये कार्यरत होता. गुरुवारी सण असल्याने तो आपल्या दुचाकीने (क्र. MH 07 AV 8281) कुडाळहून घराकडे परतत असताना, शिरवंडे येथून खडी भरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या १६ चाकी डंपरने (क्र. MH 46 BB 2048) त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत मयुरेशच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला होता, ज्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून त्यांनी त्यावेळी रस्तारोकोही केला होता.

मयुरेशची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने अधिक उपचारासाठी गोवा येथे हलवण्यात आले होते. त्याच्या उपचारासाठी रक्ताची मोठी गरज भासली होती, त्यावेळी बांदिवडे गावातील अनेक तरुणांनी माणुसकी दाखवत तातडीने गोवा गाठून रक्तदान केले होते. मात्र, मयुरेशच्या शरीराने उपचारांना अपेक्षित प्रतिसाद दिला नाही आणि रविवारी दुपारी त्याची प्राणज्योत मालवली. मयुरेश हा स्वभावाने अत्यंत परोपकारी, मनमिळाऊ आणि गावातील प्रत्येक सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमात हिरीरीने पुढाकार घेणारा तरुण होता. त्याच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण बांदिवडे गावावर शोककळा पसरली आहे. सोमवारी सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात बांदिवडे स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मयुरेश हा त्याच्या कुटुंबाचा एकमेव आधार होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. त्याच्या जाण्याने आई, वडील आणि आजी यांचा आधारवड हरपला असून, डंपर चालकाच्या चुकीच्या पद्धतीच्या वाहन चालवण्यामुळे एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याची भावना व्यक्त होत आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. अरुंद रस्ते आणि त्यावर धावणारे भरधाव डंपर यामुळे सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात आले आहे. आरटीओ आणि पोलीस प्रशासनाने अशा बेशिस्त डंपर चालकांवर करडी नजर ठेवून त्यांच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि नियमित तपासणी मोहीम राबवावी, जेणेकरून भविष्यात मयुरेशसारखा कोणताही तरुण हकनाक बळी जाणार नाही, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

error: Content is protected !!