“छत्रपतींचे विचार आणि मूर्तीची प्रतिष्ठापना हा माजी विद्यार्थ्यांचा आदर्श उपक्रम” – दिलीप तळेकर

साळीस्ते येथे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही आपली आदरस्थाने आणि देवस्थाने आहेत. शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून माजी विद्यार्थ्यांनी एक चांगली संकल्पना साकार करून दाखवली, असे प्रतिपादन माजी सभापती दिलीप तळेकर यांनी केले.

ते जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा साळीस्ते नं. 1 मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे, साळीस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच जितेंद्र गुरव, कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, केंद्रप्रमुख गोपाळ जाधव, पोलिस पाटील गोपाळ चव्हाण, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुरेश साळीस्तेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वामन ताम्हणकर, बी पी साळीस्तेकर, चंद्रकांत हरयाण, अशोक कोकाटे, मयुरेश लिंगायत, अनंत गुरव, माजी मुख्याध्यापिका पिसे, प्रकाश साळीस्तेकर, प्रभाकर वाडेकर, सचिन लवेकर, कांजीरवाडी शाळा मुख्याध्यापिका श्रीमती. कुंभार, तळेरे शाळा मुख्याध्यापक महेंद्र पावसकर, मूर्तिकार आयरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर ताम्हणकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष ओमकार गुरव, विशाल वरवडेकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष गजानन रामाणे, मुख्याध्यापिका संजना ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

तालुक्यातील पहिले स्मारक : साळीस्ते शाळेचा बहुमान (चौकट)
कार्यक्रमात बोलताना दिलीप तळेकर म्हणाले की, जिल्हा परिषद शाळेच्या आवारात महाराजांचे स्मारक उभारले जाणे ही दुर्मिळ आणि अभिमानास्पद बाब आहे. असा बहुमान मिळवणारी साळीस्ते ही तालुक्यातील पहिली शाळा ठरली आहे. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती दाखवलेली ही कृतज्ञता कौतुकास्पद आहे.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण दिलीप तळेकर आणि गुरुप्रसाद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

परसबागेचे सर्वत्र कौतुक

शाळेने पालक आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून फुलवलेल्या परसबागेचे उपस्थित पाहुण्यांनी विशेष कौतुक केले. विशेषतः कोबीच्या लागवडीचा उल्लेख करण्यात आला. तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर आता ही शाळा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सज्ज झाली असून मान्यवरांनी यावेळी शाळेला शुभेच्छा दिल्या.

यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच, माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी बोलताना किशोर गवस म्हणाले की, महाराजांची मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आता जबाबदारी वाढलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाश्वत विकास समोर ठेवून स्वराज्य निर्माण केले. ते स्वराज्य असेच टिकवायचे असेल तर आपल्याला एकनिष्ठेने आणि समन्वयाने काम केले पाहिजे.

यावेळी ओमकार गुरव, दिलीप तळेकर, गुरुप्रसाद शिंदे, विशाल वरवडेकर, किशोर गवस, प्रभाकर ताम्हणकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजना ठाकूर, सूत्रसंचालन वैभव पारधिये यांनी केले. यावेळी श्रीराम विभुते, गावीत सर, दिनेश मुद्रस, वैभव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य बारस्कर, प्रसन्ना नारकर, मंगेश कांबळे, संतोष पाष्टे, उदय बासरस्कर, बबन गुरव यांच्यासह माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!