
आत्महत्या की घातपात ?
चर्चांना उधाण
मालवण : वायंगणी येथून बेपत्ता असलेल्या एका २८ वर्षीय विवाहितेचा मृतदेह हडी कालावल पुलाजवळ खाडीकिनारी झाडाच्या वेलीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.सौ. अंतरा हर्षद दुखंडे असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनास्थळावरील स्थिती पाहता ही आत्महत्या की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
मूळची भांडुप पश्चिम-मुंबई येथील असलेली अंतरा दुखंडे ही सध्या आपल्या सासरी वायंगणी- दुखंडेवाडी येथे राहत होती. ती आचरा येथे शिक्षिका म्हणून सेवेत होती. २२ फेब्रुवारीला पहाटे ३.३० ते ३.४५ वाजण्याच्या सुमारास ती आपल्या घरातून कपडे, बॅग आणि मोबाईलसह कोणालाही काहीही न सांगता निघून गेली होती. याप्रकरणी आचरा पोलीस ठाण्यात २३ फेब्रुवारीला रात्री ११.१९ वाजता ती बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. आज हडी कालावल पुलाजवळ खाडीकिनाऱ्यालगत असलेल्या झाडाच्या वेलीला अंतराचा मृतदेह लटकलेल्या, मात्र जमिनीला टेकलेल्या अवस्थेत मिळून आला.
आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वायंगणी दुखंडेवाडी येथील अंतरा हर्षद दुखंडे, वय 28 ही महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद तिचे पती हर्षद दुखंडे यांनी आचरा पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री दिली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, माझी पत्नी ही आचरा येथील खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. शनिवारी नेहमीची कामे आटपून आम्ही रात्री झोपलो असताना रविवारी पहाटेच्या दरम्यान घराच्या मागील दरवाज्याच्या कडीचा आवाज आल्याने जागा झालो. त्यावेळी माझ्या बाजूला असलेली पत्नी जागेवर नव्हती, म्हणून मी मागच्या दरवाज्याकडे गेलो असता दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दरवाजाला बाहेरुन कडी लावल्याने दरवाजा उघडत नव्हता. त्यामुळे खिडकितू पाहिले असता मला माझी पत्नी अंतरा ही रात्री घातलेल्या गाऊनवर हातात बॅग घेवुन जाताना दिसली. म्हणून मी घरातील बॅटरी घेऊन आमच्या घराच्या समोरील दरवाजाने बाहेर जाऊन पाहिले असता माझी पत्नी मला दिसून आली नाही. परंतु त्याच दिशेने गाडीचा आवाज आला होता. त्यानंतर मी माझी गाडी घेऊन तिचा हडी, चिंदर पेट्रोलपंप याठिकाणी शोध घेतला. मात्र, ती सापडून आली नाही. म्हणून मी माझी मुंबई येथे राहणाऱ्या सासूला फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास माझ्या पत्नीच्या मैत्रिणी व आमच्या नातेवाईकांकडे, खाडी किनारी शोध घेतला, परंतु ती काही मिळून आली नाही. 23 रोजी माझी पत्नी अंतरा हिचा एम. कॉमचा देवगड कॉलेजला पेपर होता. तिथे गेली असल्याच्या शक्यतेने मी दुपारी देवगड कॉलेजला जाऊन माझी पत्नी पेपरला आली की नाही याची शिक्षकांकडे चौकशी केली. मात्र, ती पेपरला आली नसल्याचे सांगितले. त्यामुळे ती बेपत्ता झाल्याची माझी खात्री झाली. शेवटी आचरा पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.दरम्यान या घटनेमुळे या भागात हळहळ व्यक्त होत आहे. अंतरा हिच्या पश्चात पती, अडीज वर्षाची मुलगी, सासू सासरे चुलत नातेवाईक असा परिवार आहे.


Subscribe










