बहुआयामी सामाजिक कार्याची शासनाकडून दखल

श्रावणी मदभावे यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर

कणकवली | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, शिक्षण, युवक प्रबोधन, डिजिटल जागरूकता आणि सामाजिक संस्कार या विविध क्षेत्रांत पंधरा वर्षांहून अधिक काळ सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्या सौ. श्रावणी सतीश मदभावे यांना सन २०२२-२३ साठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ जिल्हास्तरीय पुरस्कार महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जाहीर झाला आहे. जिल्हास्तरावर प्रभावी सामाजिक योगदान देणाऱ्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येतो.

सौ. मदभावे यांनी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, महिला गट आणि युवक संघटनांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची व्यापक जनचळवळ उभी केली. तंबाखूविरोधी मोहिमा, मानसिक आरोग्य मार्गदर्शन, किशोरवयीन समुपदेशन आणि सामाजिक प्रबोधनाच्या विविध उपक्रमांद्वारे गेल्या दशकात त्यांनी सुमारे १,४०,००० हून अधिक नागरिकांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविला आहे.

महिला बचत गटांसाठी नेतृत्व विकास, आरोग्य मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण तसेच बांबू उद्योगासारख्या उपक्रमांद्वारे महिलांना स्वावलंबनाकडे प्रवृत्त केले. विधवा महिलांसाठी समावेशक कार्यक्रम राबवून सामाजिक मानसिकतेत सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

शिक्षण क्षेत्रात ‘रविवारची विज्ञान शाळा’ या अभिनव उपक्रमातून ग्रामीण भागातील मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रयोगशीलता विकसित केली. शिष्यवृत्ती, एनएमएमएस, नवोदय, स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, ग्रामसेवक-तलाठी भरती आदींसाठी मोफत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा व राज्यस्तरावर यश संपादन केले असून कित्येक विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, कौशल्य विकास आणि करिअर मार्गदर्शनाद्वारे स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी सक्षम केले आहे.

डिजिटल युगातील वाढत्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा विषयक विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. सुरक्षित इंटरनेट वापर, ऑनलाइन फसवणूक प्रतिबंध, डेटा सुरक्षा आणि डिजिटल जबाबदारी याबाबत त्यांनी व्यापक जनजागृती केली.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहिमा, समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रम, वृक्षलागवड, सीड बॉल कार्यशाळा तसेच गड-किल्ले संवर्धनासाठी युवकांच्या सहभागातून विशेष उपक्रम राबविण्यात आले. कृषीदिन, महिला दिन, तंबाखूविरोधी दिन, वाचन प्रेरणा दिन यांसारख्या विविध दिनविशेषांच्या माध्यमातून संस्कारमय आणि समाजाभिमुख कार्यक्रम सातत्याने आयोजित केले जातात. कला, हस्तकला, व्यक्तिमत्त्व विकास आणि कौशल्य वृद्धी यासाठी नाविन्यपूर्ण स्पर्धा व कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. ज्येष्ठ नागरिकांसाठी संवाद, आरोग्य मार्गदर्शन आणि सन्मान उपक्रमही राबविण्यात आले आहेत.

सौ. मदभावे या Maharashtra Knowledge Corporation Limited (एमकेसीएल) चे अधिकृत अध्ययन केंद्र गेली १४ वर्षे ग्रामीण भागात चालवित आहेत. संगणक शिक्षण देताना समाजभान आणि देशाभिमान यांचा अनोखा संगम साधत डिजिटल साक्षरतेसोबत मूल्याधिष्ठित शिक्षणाचा दिवा त्यांनी सतत तेवत ठेवला आहे.

त्यांच्या कार्यामागे ज्येष्ठ समाजप्रबोधक Dr. Anil Nerurkar यांची प्रेरणा असल्याचे त्या नमूद करतात.

यापूर्वी त्यांना ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ (राज्यस्तर – महाराष्ट्र शासन) तसेच ‘जिल्हा युवा पुरस्कार’ (जिल्हास्तर – महाराष्ट्र शासन) प्राप्त झाले आहेत. आता जाहीर झालेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ जिल्हास्तरीय शासन पुरस्कार हा त्यांच्या सातत्यपूर्ण, बहुआयामी आणि मूल्याधिष्ठित सामाजिक कार्याची अधिकृत दखल मानला जात आहे.

error: Content is protected !!