कुडाळ : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून आंब्रड भाजपच्या वतीने परबवाडा शाळेत शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहानग्यांमध्ये शिवचरित्राबद्दल जागृती निर्माण व्हावी, त्यांच्यातील वक्तृत्व गुणांना वाव मिळावा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, स्वराज्य संकल्पना व आदर्श विचारांची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश होता.
स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सहभागी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर, स्वराज्य स्थापनेतील योगदानावर तसेच त्यांच्या शौर्यगाथांवर प्रभावी भाषणे सादर केली.
या वक्तृत्व स्पर्धेत आलिया जहीर काजी प्रथम क्रमांक, आरोही अर्जुन रांबाडे द्वितीय क्रमांक, हर्षाली शरद राऊळ तृतीय क्रमांक यांनी यश संपादन केले. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करून आनंददायी वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य अरविंद परब, भाजप बूथ अध्यक्ष मंथन परब, जीवन राणे, प्रशांत सावंत, नीलेश कदम, आनंद तांबे, महादेव परब आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते प्रमुख उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यातही अशा शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला.
शिवजयंतीनिमित्त झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी अभिमान व प्रेरणा निर्माण झाल्याची भावना उपस्थित पालक व ग्रामस्थ तसेच मुख्याध्यापक सावंत सर व उप शिक्षक धूमक सर आदींनी व्यक्त केले.


Subscribe










