पिंगुळी येथील बॅनर ठरतोय चर्चेचा विषय
कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी गावातील म्हापसेकर तिठा येथे झळकलेला ‘मतदान बहिष्कार’ असा फलक सध्या संपूर्ण परिसरातच नव्हे, तर राजकीय वर्तुळातही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच नागरिकांच्या संतापाचा असा उघड इशारा मिळाल्याने प्रशासन आणि राजकीय नेतेमंडळींची चांगलीच कोंडी झाल्याचे बोलले जात आहे.
पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील सार्वजनिक शौचालयाची दीर्घकाळापासून झालेली दुरवस्था, दुर्गंधी व आरोग्याच्या गंभीर समस्या याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अज्ञात व्यक्तींनी सार्वजनिक शौचालयावर थेट जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना येथे मत मागण्याचा अधिकार नाही असा स्पष्ट संदेश देणारा फलक लावला आहे. या फलकावर, हा प्रश्न सुटेपर्यंत कोणत्याही उमेदवारांनी अथवा नेत्यांनी मतदान मागण्यासाठी येथे येऊ नये, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले असून, हे केवळ निषेधाचे नव्हे तर थेट मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराच मानले जात आहे.
निवडणुकांच्या तोंडावर आश्वासनांची बरसात होते; मात्र निवडणुका संपल्यानंतर मूलभूत सुविधांकडे पाठ फिरवली जाते. सार्वजनिक आरोग्यासारख्या अत्यावश्यक विषयावरही प्रशासन व लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचा संताप या फलकातून व्यक्त झाला आहे.
या घटनेमुळे पिंगुळी परिसरात जोरदार चर्चा सुरू असून, प्रशासन तातडीने दखल घेणार की नेहमीप्रमाणे ‘निवडणूक संपेपर्यंत शांतता’ हा फॉर्म्युला राबवणार? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. आता या इशाऱ्यानंतर प्रशासन व राजकीय पक्षांची पुढील भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Subscribe









