सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा ठाकरे शिवसेनेचे धडाडीचे नेते, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत वाढदिवस विशेष

सत्ता असो वा नसो जनसेवेचे व्रत जोपासणारे सेवाभावी नेतृत्व म्हणजे सतीश सावंत

कणकवली : समाजकारणातून राजकारण आणि राजकारणातून समाजकारण जोपासत सिंधुदुर्ग जिल्हयात आजवर ज्या काही मोजक्या नेत्यांनी आपली एक वेगळी ओळख जिल्हयाच्या पटलावर निर्माण केली. मग ते सत्तेत असो किंवा नसो सर्वसामान्य जनतेशी त्यांची जुळलेली नाळ कायम तशीच राहिली आहे. याच नेतृत्वांपैकी सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावचे सुपुत्र, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि ठाकरे शिवसेनेचे धडाडीचे नेते, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश जगन्नाथ सावंत यांना ओळखले जाते. लहानपणापासून घरातूनच शैक्षणिक, सामाजिक आणि संस्कारांचे बाळकडू लाभलेल्या सतीश सावंत यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव आणि अभ्यास असलेल्या सतीश सावंत यांनी त्यांच्या जिल्हा बँक अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी अनेक योजना राबविल्या. आज ते सत्ताधारी नसले तरी शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवताना दिसतात. एक अभ्यासू, लढवय्या आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून सतीश सावंत यांची पक्षात आणि जनमाणसात ओळख आहे. आज शनिवार 25 जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस असून यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा….

वडील प्राथमिक शिक्षक असल्याने लहानपणापासूनच सतीश सावंत यांच्या घरात शैक्षणिक वातावरण आणि संस्कारांची शिदोरी होती. प्राथमिक-माध्यमिक शिक्षणाचे धडे गावातच गिरवून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण कणकवली महाविद्यालयात पूर्ण केले. आपण ज्या भूमीत जन्माला आलो त्या भूमीतील लोकांसाठी सामाजिक जाणीवेतून काही काम करावे हा त्यांचा ध्यास होता. त्यांचे व्यक्तिमत्व शांत, संयमी पण अभ्यासू वृत्तीने हाती घेतलेले काम तडीस नेण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. जिल्ह्यातील गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, युवक यांचे प्रश्न त्यांनी जाणून घेतले. लोकांचे प्रश्न जलदगतीने सोडविण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना खऱ्या अर्थाने खंबीर व्यासपीठाची गरज भासू लागली आणि त्याचवेळी एका सुशिक्षित उमद्या नेतृत्वाचा सिंधुदुर्गाच्या राजकारणात प्रवेश झाला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना महाविद्यालयीन विद्यार्थी प्रतिनिधी ते जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अशा चढत्या क्रमाने त्यांचा राजकीय प्रवास झाला. सिंधुदुर्ग जि.प.चे अध्यक्ष असताना त्यांनी जि.प. च्या अनेक योजना जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवून त्यांना लाभ मिळवून दिला. तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. आपल्या 31 वर्षांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीद्वारे सतीश सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात आपले महत्वपूर्ण योगदान दिले. आज जरी ते सत्तेत नसले तरी सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांना केंद्रबिंदू ठेवून शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे त्यांचे काम नित्यनियमाने सुरु आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान, फळपीक विमा योजना अशा अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने त्यांचा पाठपुरावा शासन दरबारी सुरू असतो. विकासकामांच्या प्रश्नांवरही सडेतोडपणे ते आपली भूमिका मांडत असतात.

सतीश सावंत यांचे शैक्षणिक क्षेत्रातही महत्वपूर्ण योगदान आहे. 2001 साला पासून ते कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. गेल्या 24 वर्षात त्यांनी संस्थेच्या कार्याचा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख दर्जेदार ठेवला आहे. शेतकरी, कष्टकरी, गरीब, मजुर यांची मुलेही उच्चशिक्षित व्हावीत या उद्देशाने प्रसंगी स्वतःच्या खिशातून फी भरून या मुलांना त्यांनी शिक्षण दिले आहे. कनेडी प्रशालेचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात करिअर घडवत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कनेडी प्रशालेने गतवर्षी मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला होता.

सिंधुदुर्गच्या सहकार क्षेत्रातही सतीश सावंत यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी बँकेचा कायापालट केलाच शिवाय या बँकेच्या माध्यमातून शेती, उद्योग, व्यवसाय, दुग्धोत्पादन, पशुपालन, लघु-कुटिरोद्योग यांसाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान देत जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना, युवावर्गाला रोजगार उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यातील पडिक जमीन लागवडीखाली आणण्यासठी शेतीविशेष कर्ज अनुदान, बांबू लागवड, ऊसलागवड, भाताची विविध वाणांचे प्रकार, खैर लागवड, साग लागवड, पिकांना व शेतीला बारमाही पाणी उपलब्ध व्हावे म्हणून जलसिंचनाची निर्मिती, सेंद्रिय खताची उभारणी, आधुनिक तंत्रावर आधारित शेती व्हावी म्हणून आधुनिक यंत्रसामुग्री शेतकऱ्यांना अनुदानातून उपलब्ध करून दिली. पशुपालनांतील आधुनिक तंत्र समजावे म्हणून त्यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून राज्यपातळीवरील पशू-पक्षी-कृषी प्रदर्शन अनेक वेळा भरविले. त्यामुळे शेतीसोबतच शेतकऱ्यांना पुरक व्यवसाय सुरु करणे शक्य झाले.
सतीश सावंत यांनी जिल्हा बँकेला आपल्या कारकीर्दीमध्ये एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या अतुलनीय कार्यामुळे राज्यसरकार आणि नाबार्ड यांनी बँकेचा विशेष पुरस्कार देवून गौरव केला. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, युवा-वर्ग, महिलावर्ग, व्यापारी-नोकरदार, उद्योजक, मासेमारी, फळ बागायतदार, व्यावसायिक यांच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. आज ते कुठल्याही पदावर नाहीत परंतू सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी त्यांची तळमळ कायम आहे.

त्यांची जन्मभूमी असलेल्या भिरवंडे गावच्या विकासातही सतीश सावंत यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. गावच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमातही ते नेहमीच अग्रेसर असतात. गावचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वरावर त्यांची अपार श्रद्धा असून श्रीदेव रामेश्वराचे आशिर्वाद आणि ग्रामस्थांचे भक्कम पाठबळ हिच आपली ऊर्जा असल्याचे ते सांगतात. ते सत्तेत, पदावर असताना आणि नसतानाही सर्वसामान्यांशी त्यांची नाळ कायम जोडलेली आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये मिळून मिसळून काम करणारे ते एक प्रभावशाली नेतृत्व आहे. जनसेवेचा ध्यास त्यांनी अखंडपणे जोपासला आहे. विविध क्षेत्रात अष्टपैलू कामगिरी करण्ााऱ्या या कर्तृत्ववान नेतृत्वास आजच्या वाढदिनी आमच्या कोटी कोटी शुभेच्छा.

error: Content is protected !!